राजकारणएक हातात रिकामा हंडा आणि दुसऱ्या हातात तीन फुटी दांडा... ...

एक हातात रिकामा हंडा आणि दुसऱ्या हातात तीन फुटी दांडा… ‘श्रमजीवी’च्या विवेक पंडित यांचा नवा मंत्र; श्रमजीवी संघटनेचे पाण्याच्या हक्कासाठी पेटले आंदोलन: पाणी योजनेतील गैरव्यवहारांचा विवेक पंडित यांच्याकडून ‘पंचनामा’

spot_img

पालघरः ‘हर घर जल’ योजनांच्या कामांत झालेला गैरव्यवहार आणि त्यामुळे पाणी मिळण्यापासून वंचित राहिलेल्या महिलांना पाण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी गेल्या तीन आठवड्यांपासून पाणी आंदोलन हाती घेतले आहे. या आंदोलनामुळे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील पाणी योजनाची कामे करणाऱ्या ठेकेदारांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. ठेकेदारांच्या दलालांनी आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु तो आपण मोडीत काढला असे पंडित यांनी सांगितले.

विक्रमगड तालुक्यातील राज्यस्तरीय आढावा समितीच्या बैठकीत पाण्याच्या हक्कासाठी श्रमजीवी कोणत्याही संघर्षाला तयार आहे, असे पंडित यांनी सांगितले. नागरिकांना पाण्याचा अधिकार देण्याची आपली जबाबदारी जिल्हा प्रशासन पार पाडत नाही. उलट, आंदोलन करणाऱ्या सर्वसामान्य महिलांवर कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणार असाल, तर पहिला गुन्हा माझ्यावर दाखल करा, असे आव्हान पंडित यांनी दिले.

..तर पहिला गुन्हेगार मी!
ठेकेदारांनी अंदाजपत्रकाप्रमाणे आणि मुदतीत काम केलेले नसल्याने सर्वसामान्य नागरिकांचा पाण्याचा हक्क हिरावून घेतला जात आहे. या हक्काबाबत आवाज उठवणे, अधिकार मागणे हा जर गुन्हा ठरत असेल, तर हा गुन्हा करणारा पहिला मी आहे, असे पंडित यांनी ठणकावून सांगितले.

दोन जिल्ह्यांत हंडा मोर्चा
ठाणे, पालघर जिल्ह्यात हंडा मोर्चा सोबतच पंडित यांच्या तालुका-तालुक्यांत होणाऱ्या जाहीर सभांमुळे पेटलेल्या पाणी आंदोलनाला उभारी मिळत आहे. या सभांमधून पाण्याच्या पाइपांची खोली मोजण्यासाठी पंडित यांनी दिलेला ‘एक हातात रिकामा हंडा आणि दुसऱ्या हातात तीन फुटी दांडा’ हा मंत्र सध्या आंदोलनामध्ये लक्षवेधी ठरत आहे. हा दांडा म्हणजेच आपला पाण्याचा अधिकार घेण्यासाठी असलेला ‘राजदंड’ आहे, असे पंडित सर्वंच महिलांना सांगतात. अधिकाराचा राजदंड मी महिलांच्या हातात दिला आहे, असे पंडित यांनी यावेळी सांगितले.

झडपोली योजनेचा पंचनामा
झडपोली येथील जल जीवन मिशन योजनेचा पंचनामा श्रमजीवी संघटनेच्या महिलांनी केला. तीन फुटांऐवजी वरच्या वर पुरलेला पाईप महिलांनी काढून टाकला. पालघर जिल्ह्यातील काही दलाल नेते आणि अधिकारी ठेकेदारांनी दलाली करण्यासाठी माझ्याकडे आले होते. मी त्यांना अक्षरशः हाकलून लावले, त्यांनी माफी मागत पळ काढला, मी त्यांची नावे आज जाहीर करत नाही; पण नागरिकांच्या हक्काचे पैसे लुबाडून, योजनांमध्ये भ्रष्टाचार करून, लोकांना त्यांच्या मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी कुणी दलाली करण्याचा प्रयत्न केला, तर त्याची तमा बाळगणार नाही असा सज्जड इशारा या वेळी पंडित यांनी दिला.

…तर त्यांना आडवे करू!
ठाणे, पालघर जिल्ह्यातल्या प्रत्येक आई बहिणीचा पाण्याचा संघर्ष आता थांबायलाच हवा. पंतप्रधानांनी दिलेल्या हर घर जल जीवन योजनेने पाणी टंचाईचा काळा डाग आता पुसायलाच हवा, त्यामध्ये कुणी स्वार्थासाठी आड येत असेल तर श्रमजीवी त्याला आडवे केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा पंडित यांनी दिला आहे. देशभरातील नागरिकांना मुबलक पिण्याचे पाणी देणारी देशाच्या पंतप्रधानांची महत्त्वाकांक्षी असलेली जल जीवन मिशन वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. योजनेच्या निविदा प्रक्रिया, अंदाजपत्रकाप्रमाणे काम न करणे, पाईप खरेदीत अपहार अशा अनेक गोष्टी आता श्रमजीवी संघटना पुरव्यानिशी उघड करत असून बोगस बिल घेणारे ठेकेदार आणि देणाऱ्या अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

कामे अर्धवट तरी बिले काढली
प्रत्येक गावात शासनाच्या जल आणि जीवन मिशन अंतर्गत हर घर जल देण्याचा कार्यक्रम सुरू आहे. शासन निर्णयानुसार तालुक्यातील प्रत्येक गावातील राहणाऱ्या सर्व कुटुंबातील घरात, बंगल्यात, घरकुलात, झोपडीत, झापात नळाने पाणी पुरवठा मिळालेच पाहिजे, अशी योजना आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने कोट्यवधी रुपयाची तरतूद केली असून १५ व्या वित्त आयोग व ‘पेसा’ मधून ही पाणी पुरवठासाठी खर्च होणार आहे. या योजनेसाठी निधीची कमतरता नसताना योजना पूर्ण करण्याची मुदत संपली असूनही अनेक गावांमध्ये सर्व घरांना, झोपड्यांना गावात नळाने पाणी पुरवठा झालेला नाही. एकदा एखाद्या गावात ही योजना राबवली, की पुढचे ३० वर्षे त्या गावात पुन्हा पाण्यावर शासकीय खर्च करता येणार नाही. या जल जीवन मिशन योजनेतील पहिल्या व दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील कामे अजूनही अर्धवट आहेत. त्यामुळेच गावातील प्रत्येकाच्या घरापर्यंत नळ पोहचलेला नाही . या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे व कामी निकृष्ट दर्जाची झाल्याचे संघटनेने केलेल्या पाहणीत लक्षात आले आहे.

ठाणे, पालघरमध्ये ३८ मोर्चे
ठाणे जिल्ह्यात २१ तर पालघर जिल्ह्यात १८ ग्रामपंचायतींवर धडक मोर्चे आयोजित करून भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदारांना चांगलाच दणका देण्याचे काम श्रमजीवी संघटनेने केले आहे. ग्रामपंचायत कार्यालयावर काढलेल्या मोर्चात रिकामे हंडे घेऊन सहभागी झालेल्या महिलांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत आमच्या घरात, झोपडीत नळाचे स्वच्छ आणि मुबलक पाणी कधी येणार याबाबत लेखी घेतले.

१८९ योजना मंजूर; एकही पूर्ण नाही
शहापूर तालुक्यात जल जीवन मिशनच्या १८९ योजना मंजूर आहेत. यापैकी १०३ योजना या भावली पाणी योजनेशी संलग्न आहेत. आजपर्यंत एकाही योजनेतून प्रत्यक्ष नळाला पाणी देण्याचे काम पूर्ण झाले नाही. तालुक्यात १८९ योजनेंपैकी पैकी ८८ ठिकाणी ठेकेदार काम करत नाही, असे अधिकारी सांगतात. यातील १२ ठेकेदार काम करण्यात रस दाखवत नाही तर चार योजना वन्यजीव विभागाकडे मंजुरीसाठी प्रलाबिंत असल्याचे सांगितले जात आहे. या ठेकेदारांना ब्लॅकलिस्टेड तर करावेच; पण यापुढे त्यांना कोणतेही शासकीय कंत्राट मिळणार नाही अशा पद्धतीची कारवाई करा अशी मागणी या वेळी पंडित यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शेअर मार्केटच्या नावाखाली 38 जणांची 1 कोटी 12 लाखांची आर्थिक फसवणूक…!

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट अकाउंट उघडलं आहे, असं सांगून काही दिवस चांगल्या प्रकारे...

विकासात्मक संतुलनाच्या आधारावर नवभारत निर्माण हेच भाजपचे स्वप्न : सुजय विखे यांचं वक्तव्य

भाजप सरकारच्या गेल्या १० वर्षांच्या काळात कृषीपासून ते प्रत्येक क्षेत्रात भारताचा विकास झाला आहे....

शेअर मार्केटमध्ये पुन्हा एकदा येणार हर्षद मेहता आणि केतन पारेख ; उद्योगपती हर्ष गोयंका यांनी व्यक्त केलीय भीती…!

शेअर्सच्या किंमतीमध्ये छेडछाड केली जात असून शेअर बाजारात मोठी गडबड होत आहे. यामुळे गुंतवणूकदाराचं...

कर्ज हवंय? अहो, मग आधारकार्डवर मिळतंय ना कर्ज ; काय आहे प्रक्रिया ; घ्या जाणून …!

आधारकार्डवर तुम्हाला काही मिनिटांत पर्सनल लोन मिळू शकतं. त्याची प्रक्रिया काय आहे, त्याविषयी आज...