नगर शहरात मोकाट कुत्र्यांचं प्रमाण खूप वाढलं आहे. ही मोकाट कुत्री दुचाकी वाहनांच्या पाठीमागे धावतात. त्यामुळे किरकोळ अपघात होतात. रात्री अपरात्री ही मोकाट कुत्री पायी ये – जा करणाऱ्या नागरिकांचा पाठलाग करताहेत, त्यांना चावा घेताहेत. त्यामुळे या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त महापालिकेनं केला नाही तर लवकरच ही सर्व मोकाट कुत्री महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त पंकज जावळे यांच्या कार्यालयात सोडून देऊ, असा इशारा ‘आय लव अहमदनगर’ फाउंडेशनचे अध्यक्ष साहेबान जहागिररदार यांनी दिला आहे.
या संदर्भात जहागिरदार यांनी म्हटलं आहे, की महापालिका प्रशासनाला किरकोळ असा मोकाट कुत्र्यांचा प्रश्नदेखील मार्गी लावता येत नाही, हे नगरकरांचं मोठं दुर्दैव आहे. रस्त्यावरचे खड्डे आणि सर्वत्र दुर्गंधी हे चित्र तर नगरकरांच्या पाठीला कायमचं चिकटलेलं आहे.
प्रामाणिकपणे संकलित कर भरूनदेखील नगरकरांना नागरी मुलभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत. मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्षित राहिला असल्यामुळे ही मोठी संतापजनक बाब आहे.
महापालिका प्रशासनानं मोकाट कुत्र्यांचं निर्बिजीकरण करण्यासाठी ठेका दिला असला तरी निर्बिजीकरण होण्याऐवजी मोकाट कुत्र्यांची संख्या वाढतच आहे. यामध्ये मोठा भ्रष्टाचार असून याचीदेखील चौकशी महापालिका प्रशासनानं करण्याची गरज आहे.