शेअर मार्केटच्या माध्यमातून जास्तीत जास्त कमिशन देण्याचं आमिष दाखवत लोकांच्या कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करत सामान्य लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या शेअर मार्केटच्या बिग बुल्सची ‘उलटी गिनती’ सुरु झाली आहे. शेअर मार्केटच्या नावाखाली आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या आणि 22 कोटी रुपये घेऊन पळून गेलेल्या एका बिगबुलच्या घर आणि कार्यालयाची संतप्त नागरिकांनी प्रचंड नासधूस केली. दरम्यान, शेवगाव तालुक्यातल्या घोटण परिसरातला आणखी एक जण पळून गेल्याची जोरदार चर्चा आहे.
या घटनेमुळे शेवगावमधल्या शेअर मार्केटच्या एजंट मंडळींना मात्र ‘पळता भुई थोडी’ झाली आहे. घर आणि कार्यालयाची एवढी सारी नासधूस होऊनदेखील शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रारच दाखल नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
संतापजनक बाब अशी आहे, की एका स्थानिक पत्रकाराला या व्यवसायातल्या एका भामट्याकडून अप्रत्यक्षपणे धमकी देण्याचा प्रकार घडल्याचीदेखील चर्चा आहे. ‘शेअर मार्केट ऑनलाईन ट्रेडिंगच्या विरोधात बातमी केली तर तुझा बेत पाहू’, अशी धमकी देण्याचा प्रकार घडला असून त्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात येणार आहे.
शेवगाव पोलीस ठाण्याचा गोपनीय विभाग नक्की करतोय तरी काय?
शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेअर मार्केटच्या नावाखाली मोठा नंगानाच सुरु आहे. या व्यवसायात सामान्य लोकांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे. हे सारं सुरु असताना शेवगाव पोलीस ठाण्याचा गोपनीय विभाग नक्की काय करतो आहे, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जात आहे.