‘मला राज्याचं मुख्यमंत्री हवं आहे, माझे 40 आमदार फोडले, म्हणून मी राज्य सरकारवर टीका करत नव्हतो. तर त्यावेळची परिस्थिती तशी होती. काही लोक म्हणताहेत, की राज ठाकरे यांनी भूमिका बदलली. मात्र भूमिका बदलली नाही. तर कुठलाही राजकीय मोबदला न घेता राज्य सरकारवर टीका करण्याचं धोरण बदललंय’, अशी स्पष्टोक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांनी दिली. मुंबईत बोलविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेद्वारे त्यांनी त्यांची भूमिका आज (दि. १३) जाहीर केली.
ते म्हणाले, ‘टीका करत असताना पुढच्या पाच वर्षांत ज्या चांगल्या गोष्टी झाल्या, त्याचं स्वागतदेखील मी केलं आहे. उदाहरणार्थ 370 कलम रद्द होणं, राम मंदिरासारखा विषय. धर्माच्या नावावर आपल्याला काही राष्ट्र उभं करायचं नाही. परंतू 1992 ते 2024 पर्यंत रखडलेली एक गोष्ट मार्गी लागली. त्यामध्ये अनेक कारसेवकांनी जीवनाची आहुती दिली आहे. अनेक कार सेवकांना त्यावेळी गोळ्या घालण्यात आल्या. त्यांची प्रेतं शरयू नदीत टाकून देण्यात आली होती. मात्र राम मंदिर झाल्यामुळे त्या कार सेवकांचे आत्मे शांत झाले असतील, असं मला वाटतं.
सुप्रीम कोर्टानं जरी राम मंदिरासंदर्भातला आदेश दिला असला आणि जर नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर उभं राहूच शकलं नसतं. एन आर सी चा विषय, राम मंदिराचा विषय, 370 कलम हटवण्याचा विषय अशा अनेक गोष्टींवर मी त्यावेळी स्वागत केलं आणि नरेंद्र मोदी यांना फोन करून त्यांचं अभिनंदनदेखील केलं. एका बाजूला धडबुजरं कडबोळं आणि दुसऱ्या बाजूला खंबीर नेतृत्व अशा परिस्थितीत मोदींना साथ देणं, हे आवश्यक वाटतं म्हणून आमच्या पक्षानं असं ठरवलं, की नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची संधी द्यावी, यासाठी त्यांना पाठिंबा देण्याचा हा निर्णय घेतला.
महाराष्ट्राच्या ज्या काही मागणी आहेत, त्या त्यांच्यापर्यंत जातील आणि त्या पूर्णदेखील होतील, अशी अपेक्षा आहे. या अपेक्षांमध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यापासून महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांचं संवर्धन अशा अनेक अपेक्षा आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे असल्यामुळे त्यांना गुजरात राज्याविषयी जास्त आपुलकी असणं स्वाभाविक आहे. कारण ते गुजराती आहेत. मात्र देशातली अन्य राज्यंदेखील त्यांनी अपत्याप्रमाणं जपावीत, महाराष्ट्राचा औद्योगिक विकास करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावेत, अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि ती पूर्ण होईल, असा विश्वास वाटतो आहे.
… आणि राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून घेतला काढता पाय…!
या पत्रकार परिषदेचे ‘ब्रिफिंग’ केल्यानंतर राज ठाकरे यांना उपस्थित पत्रकारांनी अनेक प्रकारचे प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची उत्तरं राज ठाकरे यांनी त्यांच्या खास स्टाईलमधून दिलीसुध्दा. पण उद्धव ठाकरे यांच्याविषयी प्रश्न विचारताच त्यांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला. त्यानंतर कुठल्याही प्रश्नाला उत्तरं न देता ते निघून गेले.