अहिल्या नगर (अहमदनगर) जिल्हा हा सहकाराची पंढरी म्हणून ओळखला जातो. आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना या जिल्ह्यात झाला. अनेक पतसंस्था आणि बँकांचं जाळं या जिल्ह्यात विणलं गेलं. एक प्रकारे सहकाराचा एक मोठा किल्लाच या नगर जिल्ह्यात पाहायला मिळतो आहे . मात्र या किल्ल्याला भगदाड पडायला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला 110 वर्षांची जुनी असलेली नगर अर्बन बँक, नंतर संपदा नागरी पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्याच्या बातम्या ताज्या असतानाच नगर जिल्ह्यातल्या आणखी दोन पतसंस्थांमध्ये ‘मोठ्ठा’ आर्थिक घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं आहे.
संतोष बुधवंत आणि संगीता बुधवंत या दोघा पती-पत्नींनी स्थापन केलेल्या स्वामिनी आणि धनश्री या दोन पतसंस्थांमध्ये 76 लाख रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला आहे. बुधवंत पती-पत्नीविरुद्ध राहता पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, या दोघांनी जामिनासाठी कोपरगाव न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयानं तो फेटाळला. त्यानंतर त्या दोघांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात अर्ज दाखल केला. पण तिथंही तो फेटाळण्यात आला. देशाची पंचवीस वर्ष सेवा केलेल्या माजी सैनिकांच्या या बँकेत ठेवी आहेत. त्या लवकरात लवकर मिळाव्यात, अशी मागणी माजी सैनिकांनी केली आहे.
माफीनामा आणि जाहीर दिलगिरी…!
या बातमीमध्ये सुरुवातीला समता नागरी पतसंस्था असं नजरचुकीनं नाव आलं होतं. मात्र या पतसंस्थेचा सदर बातमीशी काहीच संबंध नाही. त्या पतसंस्थेची बदनामी करण्याचा आमचा हेतू नव्हता. नजरचुकीनं ते झालं. मात्र त्यात आम्ही दुरुस्ती करत असून संबंधित समता नागरी पतसंस्थेचे जे काही संचालक मंडळ आहे, सभासद आणि ठेवीदार आहेत, त्या सर्वांची आम्ही जाहीर माफी मागत असून या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहोत.