नगर अर्बन बँकेच्या 291 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केलेल्या दहा जणांविरुद्ध 90 दिवसांच्या मुदतीपूर्वीच दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. शहर विभागाचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेनं कोर्टात दाखल केलेलं हे दोषारोपपत्र 8 हजार पानांचं आहे. आर्थिक गुन्हे शाखेनं आतापर्यंत नगर अर्बन बँकेच्या गैरव्यवहारात दहा जणांना अटक केली आहे. त्या दहा जणांविरुद्ध हे दोषारोपत्र दाखल करण्यात आलं आहे.
प्रदीप जगन्नाथ पाटील, राजेंद्र शांतीलाल लुणिया, मनीष दशरथ साठे, अनिल चंदूलाल कोठारी, अशोक माधवलाल कटारिया, शंकर घनश्यामदास अंदानी, मनोज वसंतलाल फिरोदिया, प्रवीण सुरेश लहारे, अविनाश प्रभाकर वैकर, अमित वल्लभभाई पंडित अशा दहा जणांविरुद्ध हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.
नगर अर्बन बँकेतल्या 291 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर अर्बन बँकेचे तत्कालीन संचालक आणि अधिकाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या आर्थिक गैरव्यवहारामुळे 110 वर्षांची जुनी असलेली ही बँक बंद पडली असून अनेक ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी या बँकेत अडकल्या आहेत.