अहिल्यानगरच्या (अहमदनगर) गांधी मैदानावर काल (दि. १९) दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सभा पार पडली. या सभेत व्यासपीठावर बसायला खुर्चीत नसल्यामुळे लोकसभेचे उमेदवार निलेश लंके हे खाली बसले. हे पाहताच शरद पवार यांनी लंकेंच्या साधेपणाचं कौतूक केलं. निलेश लंके यांच्या लग्नाचा काल वाढदिवस होता. त्या दोघांना शुभेच्छा देण्यासाठी पवार यांनी त्यांना फुलं दिली. मात्र लंके यांनी ती कार्यकर्त्यांना देऊन टाकली. लोकांसाठी काम करणारा, लोकांमध्ये राहणारा असा नवरा सांभाळल्याबद्दल खरं तर शरद पवारांनी निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचे जाहीर आभार मानले.
दरम्यान, गेल्या पाच वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पावसात भिजत केलेल्या भाषणाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. या वेळच्या निवडणुकीत लंके यांचा खाली बसलेला व्हिडिओ व्हायरल झाला. विशेष म्हणजे ज्या लोकसभा उमेदवारासाठी नगरमध्ये शरद पवार यांनी सभा घेतली, तो उमेदवारच जनतेमध्ये खाली बसला. त्यामुळे लंके यांना साधं राहणं आवडतं. लोकांमध्ये मिसळायला आवडतं, असं शरद पवार म्हणाले.
दरम्यान, सुजय विखे यांच्या ‘त्या’ वक्तव्याच्या शरद पवार यांनी यावेळी समाचार घेतला. निलेश लंके यांना इंग्रजीत बोलता येत नाही. त्यांनी मी जसं हिंदी आणि इंग्रजीतून भाषण करतो, तसं पाठ करून बोलावं. असं झाल्यास मी लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरणार नाही, असं आव्हान दिलं होतं.
विखेंच्या या आव्हानाचा समाचार घेताना शरद पवार म्हणाले, की ‘लोकसभेत मी अनेक वेळा हिंदी, इंग्रजी आणि मराठीतून भाषणं केली आहेत. त्याठिकाणी मराठीतून भाषण केलं तरी त्याचं हिंदी आणि इंग्रजीतून भाषांतर होतं. त्यामुळे लंके यांना हिंदी आणि इंग्रजीतून भाषण करता येत नाही, हा मुद्दा महत्त्वाचा नाही. लोकांचे प्रश्न कशा पद्धतीनं ते सोडतात हे महत्त्वाचं आहे’.