अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर शहरालगत असणाऱ्या स्टेट बँक चौक, शहापूर मेहेकरी रस्त्यावरील खड्ड्यात पडून आतापर्यंत अनेक बळी गेलेले आहेत. लोकांचे जीव घेणारे हे खड्डे बुजून रस्ता दुरुस्ती करावी या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने अनेक वेळा राष्ट्रीय महामार्गाच्या उपभियंतांच्या दालनात आंदोलने केलेली आहे.
या आंदोलनाची दखल घेत या रस्त्याच्या कामासाठी ६० लाख रुपये एवढा निधी स्टेट बँक चौक शहापूर ते मेहेकरी दरम्यानच्या खड्ड्यासाठी मंजूर झालेले आहे. या खड्डे बुजवण्याच्या कामाला २ दिवसांपासून सुरुवात करण्यात आली. मात्र शहापूर येथील पेट्रोल पंपा समोर खड्डे बुजवीत असताना खडीमध्ये मातीचे मोठे प्रमाण असून डांबर चिटकत नव्हते.
त्यामुळे सदर कामाची पाहणी ग्रामस्थांच्या तक्रारी नंतर जनआधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांच्यासह कृष्णा बेरड, रामदास लगड, राम बेरड, ज्ञानदेव काळे, भानुदास नाटक, अरुण नाटक आदीसह गावकऱ्यांनी केली असता. एक दिवसापूर्वी बुजवलेले खड्डे हाताने व खोऱ्याने सहज उकरले जात होते. त्यामुळे हे निकृष्ट दर्जेचे काम तातडीने बंद करण्यात आले व अधिकाऱ्यांना बोलवून अधिकाऱ्यांनी देखील निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी केली.