शेवगाव तालुक्यात हल्ली काय चाललंय, यावर नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची करडी नजर आहे, याचाच कदाचित या तालुक्यातल्या गुन्हेगारांना विसर पडलाकी काय. एका पोलीस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला करणारा वाळू तस्कर आणि सराईत गुन्हेगार (हिस्ट्री सिटर) पिन्या कापसे याच्यावर चक्क यवतमाळच्या हल्लेखोरांनी थेट शेवगावात येऊन प्राणघातक हल्ला केला.
त्यामध्ये पिन्या कापसे वाचला व त्यांच्या तावडीतून निसटला परंतु पुढे जाऊन पिन्या कापसे टोळीने त्यांना गाठले व त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला त्यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला व दोन दिवसांनी तो मरण पावला. हा हल्ला पिन्या कापसे टोळीने केला होता व यातल्या दोघांना नगर एलसीबीच्या पथकानं अटक केली असली तरी या पार्श्वभूमीवर सामान्य जनतेतून काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्या प्रश्नांवर या लेखात आपण चर्चा करणार आहोत.
पिन्या कापसेवर हल्ला करणारे हल्लेखोर थेट यवतमाळमधून आले होते. त्या हल्लेखोरांनी पिन्या कापसेला संपविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. मात्र त्यांच्या दुर्दैवानं आणि पिन्या कापसेच्या सुदैवानं एकाची रिव्हाल्वर बंद पडली आणि दुसऱ्याचा नेम चुकला. त्या प्राणघातक हल्ल्यात पिन्या कापसे वाचला आणि त्या हल्लेखोरांचा पाठलाग करुन पिन्या कापसेनं एकावर जोरदार हल्ला केला. त्या हल्ल्यात यवतमाळचा हल्लेखोर गंभीर जखमी झाला आणि नंतर मरण पावला.
याप्रकरणी पिन्या कापसेविरुध्द आधी भादंवि 307 आणि नंतर 302 हे वाढीव कलम पोलिसांनी लावलं. या गुन्ह्याचा तपास योग्य रितीनं सुरु असला तरी काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पहिला प्रश्न म्हणजे पिन्या कापसेवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या यवतमाळच्या हल्लेखोरांचं नक्की ‘शेवगाव कनेक्शन’ काय आहे, ते हल्लेखोर नक्की किती होते, त्या हल्लेखोरांचा शेवगावच्या कोणाकोणाशी प्रत्यक्ष संपर्क आला?
दुसरा प्रश्न हा आहे, की पिन्या कापसेवर यवतमाळच्या हल्लेखोरांनी जो प्राणघातक हल्ला केला, त्यामागे काही आर्थिक व्यवहाराचं कारण होतं का आणि यातून पिन्या कापलेला संपविण्याची यवतमाळच्या हल्लेखोरांना सुपारी देण्यात आली आहे का, त्याचप्रमाणं या हल्ल्यामागं कुठली राजकीय शक्ती कार्यरत आहे का? दुसऱ्या शब्दांत विचारायचं झाल्यास पिन्या कापसेच्या प्राणघातक हल्ल्याला राजकीय कंगोरे आहेत का?
सूज्ञ वाचकहो, पिन्या कापसे हा नक्कीच कोणी महात्मा नाही. तो सराईत गुन्हेगार असून वाळू तस्करीचे त्याच्याविरुध्द गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे अर्थात एका गुन्हेगारांची बाजू मांडण्याचा आमचा उद्देश नसून यामागचं जे काही सूर्यप्रकाशाइतकं प्रखर सत्य आहे, ते जनतेसमोर यावं, याच एकमेव उद्देशानं आमचा हा लेखन प्रपंच आहे. तूर्तास इतकंच. पुन्हा भेटू पुढच्या भागांत.
क्रमशः