नेवासे तालुक्यातल्या सोनईच्या मुळा सहकारी साखर कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचे अनेक महिन्यांचे थकित पगार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकित पेमेंटसंदर्भात भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील आज (दि. २८) मुळा कारखान्याच्या गेटसमोर आमरण उपोषण करणार होते. मात्र तत्पूर्वी कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर, कडूबाळ कर्डिले, आणि कार्यकारी संचालक बेल्हेकर यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हे उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ऋषिकेश शेटे पाटील यांनी दिली.
डॉ. बाळासाहेब कोलते, नानासाहेब ढेरे, कुशीनाथ ढेरे, सरपंच टेमक, सतीष गडाख, रामकिसन आगळे आदींसह सात ते आठ शेतकरी या चर्चेदरम्यान उपस्थित होते. येत्या दीड महिन्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पेमेंट आणि कामगारांच्या पगाराचा प्रश्न सोडविण्यात येईल, असं आश्वासन मुळा कारखान्याचे चेअरमन तुवर आणि कार्यकारी संचालक बेल्हेकर यांनी यावेळी दिलं.
कारखान्याचा काटा डिफॉल्टर…?
या चर्चेदरम्यान मुळा कारखान्याचा वजन काटा नादुरुस्त असल्याबद्दल आणि कारखाना व्यवस्थापनाकडून ‘मापात पाप’ करत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान केलं जात असल्याचा आरोप भाजप युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील यावेळी केला. मात्र कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर यांनी तो फेटाळून लावला.