अविनाश देशमुख / शेवगांव
मो. नं. 9960051755
शेवगांव शहरासह तालुक्यामध्ये सध्या शेअर मार्केट आणि फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांना गंडा घालणारी टोळी सक्रिय असून अधिक परताव्याचे आमिष दाखवून ते नागरिकांना आर्थिक गुंतवणूक करण्यास भाग पाडताहेत.
दरम्यान, शेवगांव शहरात आणि तालुक्यात सध्या एक लाखाला आठ ते दहा हजार रुपये व्याज देण्याचं आमिष दाखवून लाखो करोडो रुपये नागरिकांकडून जमा करून भूलथापा देत सुरुवातीला दोन – चार महिने परतावा दिला जातो. त्यानंतर गाशा गुंडाळून पोबारा केला जातो.
या दोन-चार महिन्यांत अशा अनेक घटना घडल्या असून नागरिकांनी सतर्क होण्याची गरज आहे. अधिक परतव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये जमा करुन तीन-चार महिन्यांतच तालुक्यातल्या पूर्व भागात सी. के., डी. के. , बी. के. , एम. के. , पि. के. अशा बोगस नावांनी खासगी फायनान्स आणि निधी अर्बन लिमिटेड कंपन्यांनी गाशा गुंडाळून पोबारा केल्याची माहिती आहे.
अद्यापपर्यंत या कंपन्यांच्या विरोधात प्रत्यक्ष कोणीही पोलीस सायबर क्राईम अथवा स्थानिक प्रशासनाकडे तक्रार न केल्याने सरकारी यंत्रणानी स्वतः फिर्यादी होऊन आर्थिक गुन्हे शाखा { सक्त वसुली संचालनालय } उर्फ ई. डी. सायबर क्राईम एल. सी. बी. आदी सरकारी यंत्रणांनी याकडे जातीने लक्ष घालत या भामट्यांच्या मुसक्या आवळून गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून देण्यास मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गोरगरीब, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिक दोन पैसे मिळविण्यासाठी डोळे मिटून विश्वास ठेवत आर्थिक गुंतवणूक करताहेत आणि हे भामटे त्यांच्या हातावर तुरी देऊन पोबारा करताहेत. हे सर्व होत असताना कोट्यवधी जमा करुन खुशाल गंडा घालून पळून जातात. याची चौकशी का होत नाही? कोट्यवधींचं ट्रांजेक्शन आयकर विभाग, आर्थिक गुन्हे शाखा आणि संबंधित विभागाला दिसत नाही का? असे असताना सुद्धा जर काहीच कारवाई होत नसेल तर या सरकारी यंत्रणांचे हात यात बरबटलेले तर नसतील ना, अशी शंका सर्वसामान्य जनतेच्या मनात उपस्थित होत आहे.
दरम्यान, ‘थांबा, मी माझ्यावालं वावर (जमीन) विकतो. पण तुमच्या पैशांची परतफेड करतो, अशी विनवणी काही भामटे करत आहेत. पण लोकांचे पैसे काय तुझं वावर विकायला तु गोळा केले होते का, असा उलट सवालही गुंतवणूकदारांमधून उपस्थित केला जात आहे.
तक्रारी घेऊन येऊ नका !
दरम्यान, शेवगाव पोलीस स्टेशनच्या सूचना फलकावर स्पष्ट शब्दांत लिहिलं आहे, की शेअर मार्केट, ऑनलाईन मार्केट, क्रिप्टो करन्सी, बिटकॉइन, आर. एम. डी. अशा विविध आर्थिक कंपन्यांकडून फसवणूक झालेल्या लोकांनी तक्रारी घेऊन येऊ नये.