नेवासे तालुक्यातल्या वडाळा बहीरोबा परिसरात असलेल्या मिशनरीच्या दवाखान्यात कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी संबंधित डॉक्टरांकडून माणुसकीला काळिमा फासल्याचं कृत्य उघडकीस आलं आहे. भारतीय जनता पार्टीचे युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील यांना या संदर्भात काल (दि. १९) रात्री साडेदहा वाजता फोन आल्यानंतर त्यांनी ताबडतोब त्या दवाखान्यात जाऊन संबंधित महिलांची भेट घेतली.
दरम्यान, या प्रकरणी ऋषिकेश शेटे पाटील यांनी नेवाशाचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना फोन करून घटनास्थळी बोलवून घेतले. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेनंतर या महिलांना डॉक्टरांनी उघड्यावरच सोडून दिलं. अनेक महिलांची भूल उतरण्याआधीच डॉक्टरांनी त्यांना जमिनीवर झोपवलं. त्याठिकाणी वीज पुरवठा बंद असल्यानं रात्री सगळीकडे अंधार होता. पिण्याच्या पाण्याची सोयसुद्धा नव्हती, असा आरोप संबंधित महिलांनी केला.
अशा प्रकारचे बेजबाबदार वर्तन करणाऱ्या डॉक्टरांविषयी जिल्हाधिकारी आणि सिव्हिल सर्जन यांच्याकडे तक्रार करणार असून या सर्वांची उच्चस्तरीय चौकशी करा आणि सर्वच संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करा, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे उद्या (दि. २२) करणार असल्याचं ऋषिकेश शेटे पाटील यांनी सांगितलं.