राजकारणराजेंद्र गावित हेच उमेदवार समजून प्रचाराचा धडाका.. भाजपच्या कार्यक्रमांना हजेरी; कमळाच्या चिन्हावर...

राजेंद्र गावित हेच उमेदवार समजून प्रचाराचा धडाका.. भाजपच्या कार्यक्रमांना हजेरी; कमळाच्या चिन्हावर महायुती लढणार

spot_img

पालघर: पालघर लोकसभा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला हे अद्याप जाहीर झाले नसले, तरी भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघात कार्यक्रमाचा धडाका लावला आहे. खा. गावित हेच उमेदवार असल्याचे समजून नियोजन केले जात आहे. खा. गावित हे ही कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत.

पालघर लोकसभा मतदारसंघाच्या जागेबाबत महायुतीने अजून काहीच घोषणा केलेली नाही. दोन दिवसांत घोषणा होईल, असे सांगूनही आता आठवडा झाला आहे. महायुतीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत कोणत्याही उमेदवाराच्या बाबतीत चर्चा झाली नाही. महायुतीचा जो उमेदवार असेल, त्याचे काम करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

भाजपचा मेळाव्यांचा धडाका
पालघर लोकसभेचा महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला आहे. शिवसेनेच्या भारती कामडी यांनी प्रचाराला प्रारंभ केला आहे. पालघर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या शिंदे गटाचे राजेंद्र गावित हे खासदार असले, तरी हा मतदारसंघ कुणाचा आणि उमेदवार कोण हे महायुतीने अजूनही ठरवलेले नाही. असे असले, तरी गेल्या चार दिवसांपासून भाजपने जिल्हा कार्यालय आणि मेळाव्याचा धडाका सुरू केला आहे. शिंदे सेनेचा खासदार आपल्याकडे घेऊन कमळ चिन्हावर ही जागा लढवली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कामडी यांच्या प्रचाराला प्रारंभ
पालघर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होऊन आता आठवडा झाला आहे. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भारती कामडी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा पहिला मेळावा दोन दिवसांपूर्वी नालासोपाऱ्यात झाला. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते नितीन बानगुडे-पाटील यांच्या उपस्थितीत प्रचाराचा प्रारंभ झाला.

महायुतीचा उमेदवार नसला, तरी प्रचार सुरू
महायुतीच्या उमेदवाराचे नाव जाहीर झाले नसले, तरी पालघर लोकसभा मतदार संघात भाजपने प्रचारास आघाडी घेण्यास सुरुवात केली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आचोळे येथे जिल्हा कार्यालयाचे उद्‌घाटन करण्यात आले. भाजपने विरार पूर्वेला आर.जे. नाक्यासमोर आणि वसई पश्चिमेला झेंडाबाजार येथे दोन महायुतीचे मेळावे घेतले.

गावित यांच्याही सभा, मेळावे सुरू
राजेंद्र गावित हे शिवसेना शिंदे गटाचे खासदार आहेत. त्यांना भाजपत आणून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. भाजपने त्यादृष्टीने प्रचाराची आखणी केली आहे. गावित मेळावे घेत फिरत आहेत. त्यावरून गावित यांना कमळाच्या चिन्हावर उतरवले जाईल, असा अंदाज आहे.

महायुतीच्या फलकावर बहुजन विकास आघाडीचे नाव
पालघर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी तीन विधानसभा मतदारसंघात हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे आमदार आहेत. बहुजन विकास आघाडीने उमेदवार उभा करणार असल्याचे जाहीर केले आहे. असे असताना महायुतीच्या मेळाव्यात बॅनरवर घटक पक्ष म्हणून बहजन विकास आघाडीचे नाव लिहिले जात असल्याने संभ्रम निर्माण होत आहे. बहुजन विकास आघाडीचे नाव टाकण्याचे आदेश वरिष्ठांनी दिल्याचे सांगितले जात आहे.

महायुतीचा उमेदवार ठरला
भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक-दोन दिवसांत पालघरचा उमेदवार जाहीर होईल, असे स्पष्ट केले आहे. गावित यांनी आपणाला कामाला लागा असा वरिष्ठांचाच आदेश असल्याचे सांगितले आहे. काही तांत्रिक कारणामुळे उमेदवार जाहीर केला जात नसल्याचे सांगून, आपणाला तिसऱ्यांदा उमेदवारी मिळेल, असा दावा त्यांनी केला.

विरोधकांची टीका
हितेंद्र ठाकूर यांनी आपण ‘ईडी’, ‘सीबीआय’ला घाबरत नसून, लवकरच उमेदवार जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. येथे महायुतीचा उमेदवार ठरत नसल्याने विरोधकांनी टीका सुरू केली आहे. माझ्याविरोधात उमेदवार मिळत नसल्याने मला बिनविरोध निवडून द्या, अशी कोपरखळी महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांनी मारली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...