‘पाण्यात म्हैस आणि तिचं वर मोल’ अशा आशयाची एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. नुकत्याच होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी ही म्हण अतिशय चपखलपणे बसते आहे. कारण नगर दक्षिण मतदार संघ वगळता अनेक लोकसभा मतदारसंघात उमेदवार निश्चितीच्या चर्चा अद्यापही सुरुच आहेत. मात्र असं असतानादेखील अमुक उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल, अमूक उमेदवार इतक्या लाख मतांनी निवडून येईल, अशा चर्चा अनेक लोकसभा मतदारसंघात ऐकायला मिळत आहेत.
सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापायला हळूहळू सुरुवात होत आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मात्र एक प्रकारे प्रचाराला सुरुवात झाली असल्याचं पहायला मिळत आहे.
या मतदारसंघात भाजपचे डॉक्टर सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार निलेश लंके (कारण खासदारकीची निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी नुकताच आमदारकीचा राजीनामा दिला आहे.) यांच्यातच खरं तर चुरशीची लढत होणार आहे. याशिवाय ऐनवेळी आणखी कोण कोण अपक्ष उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात दिसतील, हेदेखील आत्ताच सांगता येणार नाही.
दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आणि माजी आमदार निलेश लंके यांचं नाव न घेता त्यांना एक आगळं वेगळं आव्हान दिलं आहे. खासदार डॉक्टर विखे एका ठिकाणी त्यांच्या भाषणात म्हणाले, की ‘मी जसं बोलतो, जसं भाषण करतो आणि माझ्या भाषणात जी जी काही वाक्यं आहेत, ती सर्व पाठ करुन समोरच्या उमेदवारानं जसेच्या तसे भाषण करुन दाखवावं. यासाठी मी त्या उमेदवाराला एक महिन्याची मुदत देतो. त्या उमेदवारांनं माझ्यासारखं भाषण करुन दाखवावं. त्यांनी माझ्यासारखे भाषण करून दाखवलं तर मी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरणार नाही’.
आता माजी आमदार निलेश लंके हे खासदार डॉक्टर विखे यांचं हे आव्हान स्विकारतील का, हे पाहणं मोठा औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.
दरम्यान, त्या भाषणात बोलताना खासदार डॉक्टर विखे म्हणाले, ज्यावेळी लोकांनी मला खासदार म्हणून निवडून दिलं आणि नगर शहराचे आमदार म्हणून संग्राम जगताप यांना निवडून दिलं, त्यावेळी मी त्यांना विनंती केली, की ज्या कामासाठी मतदारांनी आपल्यावर विश्वास टाकून आपल्याला संधी दिली आहे, ते काम आपण दोघं मिळून यापुढे करु. इथून मागे आपले जे काही मतभेद होते, ते आता संपून टाकू आणि नगर शहराला एक वेगळी ओळख देऊ. त्यावर आमदार जगताप यांनी ताबडतोब सहमती दाखवली आणि नगर शहरात उड्डाणपूल अस्तित्वात आला. बाह्यवळण रस्ता मार्गी लागला आणखी बरीचशी कामे मार्गी लागली.
खासदार व्हायचं आणि दिल्लीला जायचं, असं स्वप्न पाहणाऱ्यांनी एकदा ठरवून टाकावं, की दिल्लीला आपल्याला नक्की कशासाठी जायचंय? तीर्थयात्रेसाठी जायचंय की फिरायला जायचं, याचा अगोदर विचार त्यांनी करावा संसदेत निवडून गेल्यानंतर इंग्रजीतून भाषण करावं लागतं. याचा त्यांना कदाचित सराव नाही’, अशा शब्दांत खासदार डॉक्टर विखे यांनी माजी आमदार निलेश लंके यांना डिवचलंय.