या पृथ्वीतलावर भगवंत कशासाठी अवतीर्ण होतात, हे अध्यात्म शास्त्रात स्पष्टपणे सांगितलेलं आहे. सज्जनांचा अर्थात भक्ताचा उद्धार करणं आणि दुर्जनांचा नायनाट करणं, हा एकमेव उद्देश भगवंतांचा अवतीर्ण होण्यामागे असतो. पण भक्तांचं तसं नाही. भक्त कुठून येतात, असं जर विचारलं तर भक्त हे वैकुंठातून म्हणजे जिथं दुःख नाही, तिथून येतात आणि सामान्यांचा उद्धार करतात, हा भगवंत आणि भक्तांच्या अवतीर्ण होण्यामध्ये फरक आहे. एका अर्थानं भगवंत भक्तांच्या उद्धारासाठी येतात तर भक्त हे तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांच्या उद्धारासाठी येतात, असं प्रतिपादन ह. भ. प. शिरसाठ महाराज यांनी केलं.
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या तुकाराम बीजेनिमित्त नेवासे तालुक्यात असलेल्या सोनईतल्या दरंदले पाटलांच्या वाडग्यात आयोजित करण्यात आलेल्या किर्तन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील, प्रसिद्ध सायकलपटू शरद काळे, उदयन गडाख, अशोक आदमने, दिलीप शेटे, रामभाऊ कैतके, ज्ञानदेव मते, ‘महासत्ता भारत’ वेब न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक बाळासाहेब शेटे पाटील आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
वैकुंठवासी ह. भ. प. बन्सी महाराज तांबे यांचे समकालीन असलेले रामराव पाटील दरंदले यांनी सुरु केलेल्या या सोहळ्याची परंपरा दरंदले पाटलांच्या तिसऱ्या – चौथ्या पिढीनंदेखील पुढे चालवली आहे. अण्णासाहेब दरंदले, आबासाहेब दरंदले, बाळासाहेब दरंदले, गणेश दरंदले आणि राजेंद्र दरंदले यांनी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला.