धर्म, पाप, पुण्य या सर्व गोष्टी फक्त गरिबांनाच प्रभावित करतात, असं नाही. तर व्यवसायानं डॉक्टर असलेल्या व्यक्तीलासुद्धा याचा प्रभाव वाटू लागतो. पुण्यातल्या कोंढवा परिसरात एका डॉक्टरला काही संधीसाधू आणि भोंदू लोकांनी पुण्य कर्माद्वारे स्वर्गप्राप्ती करून देतो, असं सांगून 5 कोटी 38 लाख रुपयांना गंडवलं आहे.
याप्रकरणी डॉ. अहमद अली इनाम अली कुरेशी (रा. मेफेयर एलिगंझा, एन. आय. बी. एम. रोड कोंढवा, पुणे) यांनी फिर्याद दिली. डॉक्टर कुरेशी आणि सादिक अब्दुल मजीद शेख, यास्मिन सादिक शेख, एतेशाम सादिक शेख (रा. हार्मनी सोसायटी, कोंढवा, बिबवेवाडी रोड, गुलटेकडी, पुणे) आणि राज आढाव उर्फ नरसू यांचा एकमेकांशी परिचय होता.
आरोपी सादिक शेख, त्याची पत्नी यास्मिन आणि इतरांनी डॉक्टर कुरेश यांच्याशी गोड गोड बोलून धर्म, पाप, पुण्य आणि स्वर्गप्राप्ती याविषयी डॉ. कुरेशी यांना सांगून त्यांचा ‘ब्रेन वॉश’ केला. डॉ. कुरेश यांच्या वेगवेगळ्या मालमत्तांची 11 बक्षीसपत्रं तयार करून ही मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पाटील हे पुढील तपास करत आहेत.