पालघरः नाशिक डहाणू लोहमार्ग अव्यवहार्य असल्याने आता या लोहमार्गाला उमरोळी -इगतपुरी या लोहमार्गाचा पर्याय पुढे आला आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. उच्चशिक्षित मध्यम वर्गीय कुटुंबातील असलेल्या कॅ. विनीत मुकणे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला अनुकूलता दर्शवली आहे.
चिंतामण वनगा खासदार असताना त्यांनी आणि दयानंद मुकणे यांनी त्यांच्या काळात डहाणू-नासिक लोहमार्गाचा प्रस्ताव दिला होता. त्याबाबत सर्वेक्षण करण्याचा निर्णयही झाला होता; परंतु हा लोहमार्ग अव्यवहार्य ठरत आहे. त्यापासून फारसा फायदा होणार नसल्याने या लोहमार्गाचा विचार झाला नाही. त्यातच त्या काळात सर्वेक्षणाबाबत अचूकता नव्हती. साधने उपलब्ध नव्हती. त्यामुळे या लोहमार्गाचा प्रस्ताव जवळजवळ बासनात गुंडाळल्यासारखा आहे.
इगतपुरी- उमरोळी हा व्यवहार्य लोहमार्ग
या पार्श्वभूमीवर मुकणे यांनी आता डहाणू-नाशिक लोहमार्गाला इगतपुरी- उमरोळी या लोहमार्गाचा पर्याय दिला आहे. डहाणू-नाशिक लोहमार्गापेक्षा उमरोळी -इगतपुरी लोहमार्ग हा कमी अंतराचा आणि कमी खर्चाचा आहे. शिवाय हा लोहमार्ग महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून करता येईल.
स्थलांतर रोखणार आणि रोजगार निर्मितीही
पालघर या आदिवासी जिल्ह्यातील अनेकांचे रोजगारासाठी कायम स्थलांतर होत असते. हे स्थलांतर रोखण्यासाठी हा लोहमार्ग उपयुक्त ठरेल, असे कॅप्टन विनीत मुकणे यांना वाटते. लोहमार्गाच्या भरावाचे व अन्य काम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून केले, तर पालघर जिल्ह्यातील लोकांना या माध्यमातून काम मिळू शकेल. शिवाय पाच-सात वर्षात हा लोहमार्ग पूर्ण होईल असा विश्वास त्यांना व्यक्त केला आहे.
पालघर नाशिकपासून पश्चिम बंगाल आणि मध्य भारताशी जोडणार
इगतपुरी ते उमरोळी हे अंतर ९४ किलोमीटरचे आहे. हा लोहमार्ग झाल्यास पालघर जिल्हा नाशिक, मध्य प्रदेश पासून ते थेट पश्चिम बंगालपर्यंत लोहमार्गाने जोडला जाईल. या लोहमार्गाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील घोलवडचे प्रसिद्ध चिक्कू, जव्हारचे काजू वेगवेगळ्या ठिकाणी पाठवता येऊ शकतील. या भागातील शेतीमाल आणि इथली प्रसिद्ध उत्पादने देशाच्या अन्य भागात जाऊ शकतील तसेच अन्य भागातील उत्पादनेही रेल्वेने या भागात येऊ शकतील असा हा लोहमार्ग फायदेशीर ठरू शकतो.
सर्वेक्षणासाठी तरतूद करणार
याबाबतचा सर्वंकष प्रस्ताव फडणवीस यांच्या माध्यमातून थेट केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांना दिला आहे. मुख्यमंत्री असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला अनुकूलता दर्शवली होती. आता डहाणू-इगतपुरी रेल्वे मार्ग व्हावा हे त्यांचे स्वप्न आहे. उमरोळी -इगतपुरी लोहमार्ग झाला, तर पालघर जिल्ह्याच्या विकासाला गती येईल. दहा वर्षात पालघर जिल्ह्याचे चित्र पूर्ण बदलून जाईल. हा लोहमार्ग केला नाही, तर मात्र पुढच्या पिढ्या कधीच माफ करणार नाहीत असे मुकणे यांनी सांगितले. या लोहमार्गाला वैष्णव यांनी अनुकूलता दाखवली असून सर्वेक्षणासाठी तरतूद करण्याचे मान्य केले असल्याचे कॅप्टन विनीत मुकणे यांनी सांगितले आहे