अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातल्या सर्वच नाही, मात्र काही साखर कारखान्यांनी चार महिन्यांचं ऊसाचं पेमेंट जमा केलेलं नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं अर्थकारण धोक्यात आलं असून त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत आणणाऱ्या विशिष्ट साखर कारखान्याचे चेअरमन, एमडी आणि संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करा, अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुश काळे यांनी केली आहे.
काळे यांनी या संदर्भात राज्याच्या साखर आयुक्त कार्यालयात निवेदन दिलं आहे. यामध्ये म्हटलं आहे, की काही कारखान्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे 1 हजार कोटी रुपये अडकून पडले आहेत. ऊसाचं पेमेंट न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या मुला – मुलींचं शिक्षण, वयात आलेल्या मुलींची लग्नं आणि घरातल्या वयोवृद्धांचं आजारपण तसंच यासाठी पैशांची चणचण आदी गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह पेमेंट ऊस तोडणी कामगार, मजूर, वाहतूक ठेकेदार यांचंदेखील पेमेंट रखडलं आहे. त्यामुळे ग्रामीण भागातलं अर्थ चक्र थांबलं आहे. अशी परिस्थिती ज्यांच्यामुळे आली, त्या कारखान्याचे चेअरमन, एमडी, संचालक मंडळाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावेत.
काळे यांनी या निवेदनाच्या प्रती केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींसह राज्याच्या सहकार मंत्र्यांना देण्यात आल्या आहेत.