पालघरः जिजाऊ सामाजिक संघटनेचे अध्यक्ष नीलेश सांबरे यांनी आता कोकणातील सात लोकसभा मतदारसंघातून स्वतःचे उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी आणि महायुतीची ही डोकेदुखी वाढणार आहे.
सांबरे यांनी जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून कोकणातील विविध जिल्ह्यांत विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण, स्पर्धा परीक्षा, अभ्यासिकेची सोय आणि अन्य उपक्रम राबवले असल्याने त्यांची तरुणांमध्ये क्रेझ आहे. याशिवाय महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला आहे.
तीन लाख कार्यकर्त्यांची फळी
सांबरे यांनी कोकणातील सातही मतदारसंघात आरोग्य विषयक तसेच स्पर्धा परीक्षा विषयी विविध उपक्रम राबवले असून त्याचा फायदा हजारो युवक आणि नागरिकांना झाला आहे. सुमारे तीन लाख कार्यकर्त्यांची फळी त्यांच्या मागे असून आता सांबरे यांनी कोकणातील सातही लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याचे ठरवले असल्याने ही फळी त्यांच्यासाठी मैदानात उतरेल. त्यामुळे आता कोकणातील लढती तिरंगी-चौरंगी होण्याची शक्यता आहे
या मतदारसंघात जिजाऊचे लोकसभेसाठी उमेदवार
पालघर, भिवंडी, मावळ, ठाणे, कल्याण, रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या सात लोकसभा मतदारसंघावर आता सांबरे यांनी लक्ष केंद्रित केले आहे. स्वतः सांबरे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांच्या जिजाऊ सामाजिक संघटनेचे विविध कार्यकर्ते आणि संस्थात्मक जाळे असल्याने आता या जाळ्याचा उपयोग लोकसभा निवडणुकीसाठी करण्याचे सांबरे यांनी ठरवले आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांमध्ये कोणाची मतविभागणी सांबरे करणार आणि कुणाला फायदा होणार याची चर्चा रंगली आहे.
सामाजिक कामाला लोकमान्यता
सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून केलेल्या कामामुळे निवडणुकीत विजय मिळतो का हे आता लवकरच समजू शकेल; परंतु सांबरे यांच्या या निर्णयाचा धसका महाविकास आघाडी आणि महायुतीने घेतला आहे. त्यातच सांबरे यांचा लोकसंपर्क, त्यांचे दांडगे सामाजिक काम जसे आहे. तशीच त्यांची ‘सोशल मीडिया’ हाताळणारी यंत्रणाही प्रभावी आहे. सर्वेक्षणाचा आधार त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी घेतला आहे. त्याला आता लोकमान्यता मिळते, की नाही, हे या निवडणुकीत दिसणार आहे.