पुण्यातल्या पिंपरी चिंचवडमध्ये ऑक्टोबर महिन्यात मोठं अजब कृत्य घडल्याचं समोर आलं. सासरच्या मंडळींनी जावयाला डांबून ठेवत बेदम मारहाण केली आणि 25 लाख रुपयांची खंडणी मागितली. पिंपरी चिंचवड परिसरातल्या काळेवाडी इथल्या बायोसायन्स बायोटेक लॅबोरेटरी इथं हा प्रकार घडला.
याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात तब्बल पाच महिन्यानंतर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी महादेव ज्ञानोबा जाधव (रा. निडेबत रोड, उदगीर जिल्हा लातूर, हल्ली रा. डांगे चौक थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली.
या फिर्यादीनुसार अनिल शंकर घोणसे, सुनील शंकर घोणसे, माधव पाटील, भास्कर पाटील, काका हिवराळे, गोट्या उर्फ अश्विन पाटील यांच्यासह काही महिला आरोपी (सर्व रा. पोस्ट निवळी ता. मुखेड, जिल्हा नांदेड) यांच्यासह पाच अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी यांच्या लॅबमध्ये प्रवेश करुन त्यांना बेदम मारहाण करत 25 लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर जबरदस्तीने ईर्टिगा कारमध्ये जावयाला डांबून पोलीस ठाण्यात नेले. फिर्यादी जाधव यांच्या पत्नीने त्यांच्यावर घरगुती हिंसाचार झाल्याची तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा केला. पोलीस उपनिरीक्षक बालाजी मेटे हे पुढील तपास करत आहेत.