आम्ही ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मागितले तर ओबीसीत येऊ नका, असं म्हणता. मग तुम्ही ओबीसी असताना ‘ओपन’च्या मतदारसंघात काय करता, असा सवाल मराठा समाजाचे नेते ‘संघर्ष योद्धा’ मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ते मुंबईत आले होते.
जरांगे पाटील म्हणाले, ‘वैयक्तिक मला राजकारणात येण्याची इच्छा नाही. मात्र मराठा समाजाला तुमच्या माध्यमातून खुलं आवाहन आहे, की ज्यांना तुम्हाला पाडायचं, त्यांना पाडा. या लोकसभेच्या निवडणुकीत पाडायचा इतिहास रचला जायला हवा.
भावनेच्या आहारी जाऊन सामाजिक चळवळी करणं शक्य आहे. मात्र राजकारण करणं शक्य नाही. कारण त्यासाठी मोठी जुळवाजुळव करावी लागते. समीकरणं जुळवावी लागतात. यासाठी वेळ नसल्यानं मराठा समाजाचं नुकसान झालं असतं. मला समाजाचं नुकसान करायचं नव्हतं. मात्र दि. 4 जूनपर्यंत मराठा समाजाला जर आरक्षण देण्यात आलं नाही तर विधानसभा निवडणुकीत मात्र संपूर्ण शक्ती पणाला लावणार आहोत.
विधानसभा निवडणुकीत मी उभा राहणार नाही. समाजबांधव सत्ताधाऱ्यांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम करणार आहेत. महायुतीच्या लोकांचं आम्हाला देणं घेणं नाही आणि महाविकास आघाडीच्या लोकांचंदेखील आम्हाला काही देणं घेणं. महाविकास आघाडीच्या लोकांनी आमचं 16 टक्के आरक्षण घालवलं. महायुतीच्या लोकांनी गरज नसताना दहा टक्के आरक्षण दिलं. मात्र त्याचा तरुणांना काहीच फायदा होत नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मात्र मराठा समाजाची ताकद पाहायला मिळणार आहे.
8 जूनला नारायणगडावर सगळेच या…!
येत्या आठ जून रोजी बीड जिल्ह्यातल्या नारायण गडाच्या 900 एकर मैदानावर देशभरातला मराठा एकत्र येणार आहे. या दिवशी मात्र कोणीही घरी राहू नका. मराठा समाजाच्या सर्वांनीच नारायण गडावर या, असे आवाहन जरांगे पाटील यांनी यावेळी बोलताना केलं.