एक वर्षापूर्वी बदलीचे आदेश असलेला कनिष्ठ सहाय्यक लिपिक अद्यापही कार्यमुक्त नाही ; नगर झेडपीच्या दक्षिण सार्वजनिक बांधकाम विभागातला अनागोंदी कारभार
अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्हा परिषदेचा कारभार कशा प्रकारचा चालतो याची अनेक उदाहरणं देता येतील. पण तूर्तास एक जरी उदाहरण द्यायचं ठरलं, तर नगर जिल्हा परिषदेच्या दक्षिण विभागाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात एक कनिष्ठ सहाय्यक लिपिक कार्यरत आहे. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांच्या आदेशाने दिनांक 17. 5. 2023 रोजी या कनिष्ठ सहाय्यक लिपिकाची नेवाशाच्या जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागात प्रशासकीय बदली करण्यात आली होती.
विशेष म्हणजे या कनिष्ठ सहाय्यक लिपिकाला तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले होते. या लिपिकाला बदलीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी दिनांक 29. 2. 2024 रोजी कार्यमुक्त करण्यात येत असल्याचं एका पत्रात म्हटलं आहे. म्हणजे तब्बल दहा महिन्यांनंतर संबंधित लिपिकाला कार्यमुक्त करण्यात येत असल्याचं या पत्राद्वारे स्पष्ट होत आहे.
‘त्या’ कनिष्ठ सहाय्यक लिपिकाला कोण घालतंय पाठीशी…? – सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदलीच्या आदेशांची अंमलबजावणी करण्याचे आदेश होऊनही जर दहा दहा महिने कनिष्ठ सहाय्यक लिपिक एकाच जागेवर घुटमळत असेल तर बदलीचा हा फार्स कशासाठी, असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होत आहे. हा सहाय्यक कनिष्ठ लिपिक बदली होऊनही कार्यमुक्त होत नसेल आणि या पदावर त्याची मक्तेदारी होत असेल तर या कनिष्ठ सहाय्यक लिपिकाला नक्की कोण पाठीशी घालतंय, याचा शोध जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर हे घेतील का, हा खरा प्रश्न आहे.