पालघरः पालघर लोकसभा मतदारसंघ महायुतीत कोणाच्या वाट्याला जाणार हे अद्याप ठरले नसले, तरी उमेदवार मात्र राजेंद्र गावितच असतील हे जवळजवळ निश्चित झाले आहे. त्यामुळे गावित यांनी प्रचाराची एक फेरी पूर्ण केली असून विरोधकांना तितक्याच आक्रमकपणे प्रत्युत्तर देण्याचे तसेच आक्रमकपणे प्रचार करण्याचे त्यांचे धोरण आहे.
खासदार गावित यांनी आतापर्यंत मतदारसंघाच्या सर्व विभागाचा दौरा पूर्ण केला आहे. आताही गावोगावी बैठका, मेळावे ते घेत आहेत. महायुतीत हा मतदारसंघ कोणाला हे अद्याप ठरले नसले, तरी खासदार गावित हेच या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार असतील. प्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर ते निवडणुकीत उभे राहू शकतात.
विरोधकांना जशास तसे उत्तर
उमेदवारी जाहीर होईल तेव्हा होईल; परंतु तोपर्यंत विरोधकांपेक्षा प्रचारात कुठेही कमी पडता कामा नये, यावर त्यांचा भर आहे. पालघर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जोरात प्रचार सुरू केला आहे. त्या वारंवार खासदार गावित यांच्यावर टीकेचे प्रहार करीत आहेत. अन्य कुणी त्यांना उत्तर देत नसले, तरी खासदार गावित त्यांनी मात्र त्यांना जशास तसे उत्तर देण्याचे ठरवले आहे.
लायकीच काढली
कामडी यांनी बोईसर येथील सभेत खासदार गावित यांनी पाच वर्षात एकही काम केले नसल्याची टीका केली होती. या टीकेला खासदार गावित त्यांनी तितकेच जोरदार प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कामडी यांनी टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना खासदार गावित यांनी लायकी नसलेल्या व्यक्तींनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका करू नये, असा सल्ला दिला होता.
टीकेला आकडेवारीतून उत्तर
एकीकडे कामडी यांना बहीण संबोधायचे आणि त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्र्यावर केलेली टीका तितक्याच ताकदीने परतवून लावायची अशी व्यूहनीती खासदार गावित यांनी आखली आहे कामडी यांना आपण कोणावर टीका करतो, याचे भान ठेव ठेवण्याचा सल्ला खासदार गावित यांनी दिला. शिवाय पाच वर्षात काहीच काम केले नाही, या टीकेला ही त्यांनी केलेल्या कामाच्या आकडेवारीनिशी उत्तर दिले.