नेवासे तालुक्यातल्या दोघांनी शेवगाव तालुक्यात शेअर मार्केटचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकाला चाकूचा धाक दाखवून सात लाख रुपये दर महिन्याला खंडणी दे. आमची सेटिंग थेट एसपी ऑफिसपर्यंत आहे. पोलीस आम्ही मॅनेज केलेले आहेत. तुझ्या विरोधात अर्ज देऊन तुला बदनाम करू. हप्ता दे नाही तर तुला मारून टाकू, अशी धमकी दिली. याप्रकरणी शेवगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शेअर मार्केट व्यावसायिकानं या संदर्भात शेवगाव पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे, की ‘मी शेअर मार्केट आणि शेती हा व्यवसाय करतो आहे. फेब्रुवारी महिन्यात मी शेतीमध्ये काम करत असताना नेवासे तालुक्यातले दोघं आले आणि चाकूचा धाक दाखवत म्हणाले, तू शेअर मार्केटमधून खूप पैसे कमवले आहेत. आम्हाला सात लाख रुपये महिना हप्ता दे. नाही तर तुला मारून टाकू. हप्ता दिला नाही तर सर्व कार्यालयांत तुझ्याविरुद्ध अर्ज करून तुला परेशान करून सोडू’.
दरम्यान, या प्रकरणी शेवगाव पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्या दोन तरुणांपैकी योगेश चावरे असं एकाचं नाव आहे. शेअर मार्केट व्यावसायिकाला धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई केली असली तरी यामध्ये अनेकांची आर्थिक फसवणूक झाली आहे. त्यासाठी शेवगावचे पोलीस पुढाकार घेतील का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.