मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं, या मागणीसाठी तुम्ही काहीच न करता मूग गळून गप्प का आहात? उत्तर द्या! मराठा समाज बांधवांच्या मागणीचे हे निवेदन आत्ताच घ्या. नंतर भाषण करा, असं आवाहन करत एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत अशोक चव्हाण यांच्या सभेत मराठा समाज बांधव आक्रमक झाल्याचं दिसून आलं.
नांदेड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रताप चिखलीकर यांच्या प्रचारासाठी अशोक चव्हाण जाहीर सभेत बोलत होते. तेव्हा गोंधळाचा हा प्रकार घडला.
दरम्यान, अशोक चव्हाण यांनी त्या सभेत मराठा समाज बांधवांचे निवेदन स्वीकारलं, त्यांच्याशी थोडी चर्चा केली आणि नंतर पुन्हा सभा सुरू झाली. या गोंधळाच्या परिस्थितीची नांदेडमध्ये प्रचंड चर्चा आहे.
अशोक चव्हाण हे काँग्रेस मधून भाजपमध्ये गेले आहेत. मराठा समाज बांधवांचा भाजपवर प्रचंड रोष आहे. देशभरात लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.
वास्तविक पाहता लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली नसली तरी राज्यात अनेक ठिकाणी लोकसभा निवडणुकीवरून वातावरण गरम व्हायला सुरुवात झाली आहे. भाजपविरुद्ध मराठा समाज नाराज असल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये असे गोंधळाचे प्रकार अनेक ठिकाणी होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्याचं पोलीस दल त्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगण्यात येत आहे.