लोकसभेच्या अहमदनगर दक्षिण मतदार संघात प्रचंड अशा चुरशीची निवडणूक होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आमदार लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातून आमदारकीच्या पदाची जबाबदारी निभावली. मात्र आता त्यांनी या पदाचा राजीनामा दिला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे ते लोकसभेची निवडणूक लढविणार आहेत. ही लढत विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे आणि आमदार लंके यांच्यात होणार आहे. त्यामुळे अत्यंत चुरशीच्या होणाऱ्या या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होणार आहेत. यामध्ये खासदार डॉ. विखे आमदार लंके ही लढत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर आमदार लंके यांनी त्यांना निवडून दिलेल्या मतदारांची आणि अजित पवार यांची माफी मागत आमदारकीचा राजीनामा दिलाय.
आमदार लंके म्हणाले, ‘पारनेर नगर मतदार संघातल्या सर्वांची सुरुवातीला माफी मागतो. अजित पवार यांचीदेखील माफी मागतो. तुम्ही सर्वांनी मला आमदारकीला संधी दिली. मात्र आपल्या सर्वांना लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं असल्यानं हा कठोर निर्णय मी घेतला आहे.
आमदार लंके पुढे म्हणाले की ‘स्वेच्छेने यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. लोकसभेची निवडणूक आपल्या सर्वांसाठी जीवन आणि मरणाची लढाई आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक आपल्याला जिंकायचीच आहे. अजित पवारांनी आपल्याला राजकारणात खूप मदत केली. त्यामुळे त्यांच्याबद्दल माझ्या मनात आजही आणि उद्यादेखील आदराची भावना राहील. आपला देश जातीपातीवर बोलायला लागला आहे. मात्र आपल्या देशाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आहे’.