हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रंगली राजकीय जुगलबंदी !

spot_img

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये उद्यापासून (दि. 19) हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्यात विशेषत: मुंबईत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेते मंडळींमध्ये राजकीय जुगलबंदी पहायला मिळाली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या मोर्चाला ‘नॅनो मोर्चा’ म्हटलंय. तर ज्यांनी या मोर्चासाठी जय्यत तयारी केली, त्या खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या टिकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

खासदार राऊत यांनी या मोर्चाचा ट्विटरवर जो व्हिडिओ टाकलाय, तो मराठा मोर्चाचा व्हिडिओ असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय. खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय, की ‘महाविकास आघाडीच्या मोर्चाची खिल्ली उडविणार्‍या लोकांना भाजपकडून गुंगीचं औषध दिलं जातंय. त्या गुंगीचा पाॅवर संपला, की या लोकांना पुन्हा भाजपकडून गुंगीचं औषध दिलं जातं’.

दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी शिंदे – भाजप सरकारविषयीचा अडचणीतला प्रश्न विचारला असता पवार यांनीही त्यांच्या स्टाईलनं उत्तर दिलं. ते म्हणाले, ‘हा त्यांचा आपसातला मामला आहे. आम्ही त्यांच्या खासगी मुद्द्यात नाक खुपसत नाही. त्यांच्या नाकाखालून आम्ही सरकार पळवलं. तेव्हा आम्हाला आता त्यात नाक खुपसायचं नाही’.

सन 2024 मध्ये पुन्हा मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांना बसविण्यासाठी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना आज एका सभेत आवाहन केलं. त्याविषयी पत्रकारांनी माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विचारलं असता 2024 च्या निवडणुकीला अद्याप खूप अवकाश आहे. मात्र त्यावेळी काय होईल, हे सांगायला आम्ही काही ज्योतिषी नाहीत, असं स्पष्ट उत्तर त्यांनी दिलं.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :