…आणि टप्प्यात आलेलं वाळूचं डंपर पाथर्डी पोलिसांनी सोडून दिलं ! ‘कलेक्शन’वाल्यांच्या पराक्रमापुढे भल्या भल्यांची डाळ शिजेना!

spot_img

… आणि टप्प्यात आलेलं वाळूचं डंपर पाथर्डी पोलिसांनी सोडून दिलं!..    ‘कलेक्शन’वाल्यांच्या पराक्रमापुढे भल्या भल्यांची डाळ शिजेना!

 

पाथर्डी तालुक्यातल्या एका सामाजिक कार्यकर्त्यानं बेकायदा वाळू वाहतूक करणारा एक डंपर अक्षरश: पाठलाग करुन पोलिसांच्या स्वाधीन करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र पाथर्डी पोलीस ठाण्याच्या ‘कलेक्शन’ करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यानं टप्पात आलेला तो डंपर सोडून दिल्याची घटना नुकतीच घडलीय.

 

विशेष म्हणजे हा वाळूचा डंपर पाथर्डी पोलीस ठाण्यासमोरुन गेला तरीही तो पकडून जप्त करण्याचा ‘प्रताप’ पाथर्डी पोलिसांना करता आला नाही. याउलट नाहक आमचा वेळ घेतला, म्हणून तुझ्याविरुध्द गुन्हा दाखल करतो, अशी धमकी पाथर्डी पोलीस ठाण्यातल्या एका पोलीस कर्मचार्‍यानं त्या सामाजिक कार्यकर्त्याला दिली.

 

वाळूची सर्राच बेकायदा सुरु असताना वाळू तस्करी करणारी वाहनं पाथर्डी पोलिसांच्या नाकावर टिच्चून जात असताना आणि जागरुक सामाजिक कार्यकर्ते यासाठी पोलिसांना स्वत:चा जीव धोक्यात घालून मदत करायला असतानादेखील पाथर्डी पोलीस नक्की कोणाच्या दबावाखाली आहेत, हा खरा चिंतनाचा विषय आहे.

 

पाथर्डी तालुक्यात वाळू, डबर, खडी, मुरुम आदी गौण खनिजांचा बेकायदा उपसा आणि विक्री कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते करताहेत, कोणत्या लोकप्रतिनिधीचा यासाठी पाथर्डी पोलिसांवर दबाव आहे, हे न समजण्याइतकी पाथर्डीची जनता दूधखुळी नक्कीच नाही.

 

राज्याचे महसूलमंत्री आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मध्यंतरी वाळूमाफिया आणि वाळू तस्करांच्या अर्थकारणाचं कंबरड मोडणारी धाडसी आणि धडाकेबाज कारवाई केली होती. त्या कारवाईचं जिल्ह्यात स्वागत करण्यात आलं.

 

त्यानंतर पालकमंत्री विखेंनी 5 हजार रुपये ब्रासची वाळू अवघ्या 500 ब्रासने सामान्य नागरिकांना उपलब्ध करुन देण्याची ‘राणा भीमदेवी’च्या थाटात घोषणा केली होती. मात्र ही केवळ नुसती घोषणाच राहिली का? नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात यावर काहीच चर्चा का झाली नाही ?

 

नगर जिल्ह्यात प्रचंड बेकायदा वाळू आणि इतर गौण खनिज या राष्ट्रीय संपत्तीची दिवसाढवळ्या लूट सुरु आहे. परिणामी पर्यावरणाची प्रचंड हानी होत आहे. त्यामुळे पालकमंत्री विखे यांनी नुसतीच घोषणाबाजी न करता प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा नगर जिल्ह्याच्या जनतेतून केली जात आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :