मुंबई विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांची झालीय नियुक्ती! भारतींसाठी सरकारनं ‘क्रिएट’ केली पोस्ट?
मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशा प्रकारचा शासन आदेश काढण्यात आला आहे. यापूर्वी मुंबईत विशेष पोलीस आयुक्त पदाची पोस्ट नव्हती. पण आता विशेष पोलीस आयुक्त पदाची पोस्ट तयार करण्यात आली आहे.
देवेन भारती हे 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. 2014 ते 2019 दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात भारती हे शहरातील सर्वात शक्तिशाली आयपीएस अधिकारी होते. त्यानंतर ते लॉ अँड ऑर्डरचे सह आयुक्त झाले. त्यानंतर त्यांना अॅडिशनल डीजीपी म्हणून बढती देऊन दहशतवादविरोधी पथकात हलवण्यात आलं होतं.
देवेन भारती यांची 13 डिसेंबर 2022 रोजी ट्रॅफिक जॉइंट कमिशनर असताना बदली झाली होती. त्यांची जागा राजवर्धन यांनी घेतली होती. तेव्हापासून ते एटीस प्रमुख विनीत अग्रवाल, ठाणे येथील सीपी बिपिन कुमार सिंह आणि एसीबीचे अॅडिशनल डीजी प्रभात कुमार यांच्याबरोबर भारती हेही नवं पोस्टिंग मिळण्याची प्रतीक्षा करत होते.
प्रशासकीय निकड म्हणून पोलीस आयुक्त, बृहनमुंबई, यांच्या अधिपत्याखाली पोलीस सहआयुक्तांच्या कामावर अविक प्रभावीपणे पर्यवेक्षण करण्यासाठी, अपर पोलीस महासंचालक दर्जाच्या पदाची आवश्यकता विचारात घेऊन, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील संचालक, सुरक्षा आणि अंमलबजावणी हे ‘अपर पोलीस महासंचालक’ दर्जाचे पद, पोलीस आयुक्त, बृहनमुंबई, यांच्या आस्थापनेवर वर्ग करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम (1951 चा 22) च्या कलम 5 अन्वये, उक्त अधिनियमातील तरतुदींच्या अधीन, राज्य शासनास, सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे, पोलीस दलात विविध दर्जाची आणि संख्येने पदे, त्यांची कर्तव्ये व कार्य आणि अधिकार निर्धारित करण्याचे अधिकार आहेत.
तसेच, उक्त अधिनियमातील कलम 7 अन्वये एखादा पोलीस अधीकारी यास पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, पोलीस सहआयुक्त नियुक्त करण्याचे अधिकार राज्य शासनास आहेत. अशा अधिकाऱ्याने पार पाडावयाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या, वापर करावयाचे अधिकार, इत्यादी निर्धारित करण्याचे अविकार हे, पोलीस महासंचालकांच्या अधीन पोलीस आयुक्त यांना आहेत.
पोलीस आयुक्त, बृहनमुंबई, यांच्या अधिपत्याखाली पोलीस सह आयुक्तांच्या कामावर अधिकारी प्रभावीपणे पर्यवेक्षण करता यावे म्हणून त्यांच्या अधीन विशेष पोलीस आयुक्त हे ‘अपर पोलीस महासंचालक’ दर्जाचे पद सुपूर्त करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती. त्या अनुसार शासनाने निर्णय घेतला आहे.