घरफोडीच्या गुन्ह्यात तीन वर्षांची शिक्षा झालेला आणि पॅरोल रजेवरुन हजर न होता एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपी जेरबंद करण्यात अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी अहमदनगर जिल्ह्यातल्या फरार व पाहिजे आरोपींचा आढावा घेऊन आरोपीविरुध्द विशेष मोहिम राबविण्याचे आणि कारवाई करण्याबाबत पोनि दिनेश आहेर (स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर) यांना आदेश दिले होते.
या आदेशान्वये पोनि आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक फौजदार भाऊसाहेब काळे, पोहेकॉ. विजयकुमार वेठेकर, देवेंद्र शेलार व पोना. संतोष लोढे या पोलीस अंमलदारांना भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या हद्दीत (गु.र.नं. 7/2022 भादविक 224 प्रमाणे) दाखल गुन्ह्यातला आरोपी सुरज सुनिल वाल्मिकी (रा. इंदिरानगर, भिंगार, ता. नगर) याला अटक करण्याचे आदेश दिले.
आरोपी सुरज वाल्मिकी याच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. 53/2018 व 2) गु.र.नं. 62/2018 भादंविक 457, 380, 34 या दोन्ही गुन्ह्यात तीन वर्षे कारावास व सह हजार रुपये दंड तसंच दंड न भरल्यास दोन महिने कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
आरोपी वाल्मिकी हा येरवडा मध्यवर्ती करागृह, जिल्हा पुणे येथे शिक्षा भोगत होता. परंतू कोरोना पॅरोल रजेवर कारागृहाबाहेर होता. दिनांक 01/06/2022 रोजी पॅरोल रजा पूर्ण होऊनही तो कारागृहात हजर न होता फरार झाला होता. बेकायदेशीररित्या कारागृहाबाहेर असलेल्या आरोपीची माहिती घेत असताना पोनि दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की, आरोपी सुरज वाल्मीकी (रा. इंदिरानगर, भिंगार, ता. नगर) हा त्याच्या राहत्या घरी येणार आहे.
या माहितीनुसार पोनि आहेर यांनी एलसीबीच्या पोलीस पथकास कळवून खात्री करुन कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. या पथकातील पोलीस अंमलदारांनी बातमीतील नमूद ठिकाणी जाऊन आरोपीची माहिती घेत असताना एक इसम पथकास पाहून पळून जाऊ लागला.
पोलीस पथकाने लागलीच त्याचा पाठलाग करुन त्यास शिताफीने ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव सुरज सुनिल वाल्मिकी (रा. इंदिरानगर, भिंगार, ता. नगर) असे असल्याचे सांगितले. त्याला ताब्यात घेऊन भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये हजर केले. पुढील कारवाई भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर, अनिल कातकाडे, उविपोअ, नगर शहर विभाग यांच्या सुचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांनी केली.