दुचाकीस्वारानं पाय लावला आणि टेम्पो अक्षरश: धावला !

spot_img

दुचाकीला रिक्षाचालकानं पाय लावून धक्का देणं, हे तुम्हा माहित आहे. कधी कधी एखाद्या दुचाकीस्वारानं दुसर्‍या दुचाकीला पाय लावून धक्का देणं, हेदेखील तुम्ही समजू शकता. मात्र एका दुचाकीस्वारानं चक्क टेम्पोला पाय लावून धक्का देणं आणि त्यामुळे तो टेम्पो अक्षरश: धावला, हे तुम्हाला क्षणभर पटणार नाही ना?

पुण्यातल्या पिंपरीमध्ये हा प्रकार अनेकांना पहायला मिळाला. पुणे-मुंबई महामार्गावर नाशिक फाटा ते वल्लभनगर दरम्यान सेवा रस्त्यावर रविवारी (दि. 18) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास एक दुचाकीस्वार एका टेम्पोला पाय लावून धक्का देत होता.

सायंकाळी गर्दीच्या वेळेत भररस्त्यात हा धक्का देण्याचा प्रकार सुरू होता. दुचाकीस्वार भरधाव वेगात दुचाकी चालवून टेम्पोला पाय लावून धक्का देत होता. त्यामुळे टेम्पोदेखील वेगानं जात होता. काहींनी याचे फोटो आणि व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला.

मध्यंतरी पुण्यातल्या एका रिक्षाचालकानं चक्क मर्सिडीजला धक्का दिला होता. हा व्हिडिओ सोशल मिडियावर खूप व्हायरल झाला होता. पुण्यात असे किस्से नेहमी घडत असतात. आता एका दुचाकीस्वारानं ज्या टेम्पोला पाय लावून ‘दे धक्का’ तंत्राचा वापर केला, तो टेम्पो इलेक्ट्रिक टेम्पो होता, असंही सांगितलं जातंय.

काही कारणामुळे हा इलेक्ट्रिक टेंपो बिघडला आणि भर रस्त्यातच बंद पडला. यामुळे मुंबई – पुणे महामार्गावर वाहतुकीला काहीसा अडथळा आला. मात्र लोकांना त्रास होणार नाही, याची पुणेकर नागरिक पुरेपूर काळजी घेत असतात.

या दुचाकीस्वारानंही ती घेतली आणि बंद पडलेल्या इलेक्ट्रिक टेंपोला पाय लावून सहकार्याची भावना जोपासली. विशेष म्हणजे या दुचाकीस्वारासोबत मागे आणखी एक जण बसला होता. पाठीमागून येणार्‍या वाहनांना तो इशार्‍याद्वारे या ‘दे धक्का’ तंत्राची माहिती देत होता.

पुणेकर हे शिस्तीला फार कडक असतात, स्वभावानं काहीसे तुसडे आणि खडूस असतात, असं जे काही पुणेकरांबद्दल बोललं जातं, ते अशा प्रसंगांनी धांदात खोटं ठरलंय. ओळख पाळख न पाहता एकमेकांना मदत करण्याचा पुणेकरांचा स्वभाव मोठी कौतुकास्पद अशी बाब आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :