Anti Corruption: पालघरचे उपजिल्हाधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
नियमानुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनही फाईल क्लिअर करण्यासाठी उपजिल्हाधिकारी जाधवर यांनी तक्रारदारांकडे ५० हजारांची लाच मागितली.
मनोर: पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांना एका प्रकरणात ५० हजार रुपयांची लाच घेताना मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली आहे. सुमारे १० ते १५ अधिकारी असलेल्या टीमने सापळा रचून त्यांच्या कार्यालयातच त्यांना अटक केली.नुकतीच पालघर मधून त्यांची बदली रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे झाली होती.मात्र एक वर्ष वाढवून मिळावे यासाठी ते प्रयत्नशील होते. वाडा येथील एका आदिवासी खातेधारकाची जमीन नावावर करण्यासाठी आदिवासी असलेले तक्रारदार आपली फाईल घेऊन गेले होते.नियमानुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनही फाईल क्लिअर करण्यासाठी उपजिल्हाधिकारी जाधवर यांनी तक्रारदारांकडे ५० हजारांची लाच मागितली.
तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने मुंबईच्या प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.मंगळवारी दुपारी राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग याच्या अध्यक्षांची पत्रकार परिषद पूर्ण केल्यानंतर ते आपल्या कार्यालयात आले. त्यानंतर तक्रारदारांनी त्यांच्या कार्यालयात येऊन संपर्क साधल्यानंतर कार्यालयातच 50 हजार रुपयांची लाच घेताना त्यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने झडप घातली. ह्या दरम्यान सुमारे 15 ते 20 अधिकारी कार्यालयातील सर्व कागदपत्रांची तपासणी करीत होते.या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया उशिरा पर्यंत सुरू होती.