50 हजार रुपयांची लाच घेतली! पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचाऱ्यावर एसीबी केला गुन्हा दाखल…
छत्रपती संभाजीनगर – अतिक्रमण काढण्यासाठी त्यांनी ५० हजार रुपयांची लाच घेतली़ मात्र, अतिक्रमण काढलेच नाही. त्यानंतर दोन टप्प्यात घेतलेले पैसे परत करण्याचा वादा केला. मोबाईल रेकॉडिंगवरुन पोलीस निरीक्षक व पोलीस अंमलदारावर लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश सुदाम यादव (वय ४५, रा़ वीटखेडा, जि. छत्रपती संभाजीनगर), पोलीस अंमलदार सुरेश बाबु सिंग पवार (रा. जय भवानीनगर, जि.छत्रपती संभाजीनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबतची माहिती अशी की, तक्रारदार यांच्या मालकीच्या गारखेडा गट येथील जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. हे अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळविण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. अतिक्रमण काढण्यासाठी पवार याने ५० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडी अंती ५० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढल्यानंतर जागेचा ताबा मिळविल्यानंतर १ लाख रुपये देण्याचे ठरले.
त्यानुसार ३ एप्रिल २०२४ रोजी सुरेश पवार याच्याकडे ५० हजार रुपये देण्यात आले. त्यानंतरही अतिक्रमण काढण्यात आले नाही. तेव्हा तक्रारदार यांनी पवार याची भेट घेऊन त्याच्याकडे दिलेल्या पैशांची विचारणा केली. तो पोलीस निरीक्षक राजेश यादव यांच्या कॅबिनमध्ये घेऊन गेला. त्या ठिकाणी यादव यांच्यासमोर उभे केले. तेथे तुमचे काम न झाल्याने दिलेले पैसे दोन टप्प्यात परत देतो, असे राजेश यादव म्हणाले. हे सर्व तक्रारदार यांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले. त्या आधारे पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे अपर पोलीस अधीक्षक मुकुंद अघाव, पोलीस उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक राजीव तळेकर व सहकारी पोलीस हवालदार प्रकाश घुगरे, अशोक नागरगोजे, सी एन बागुल यांच्या पथकाने केली.