दिनांक 17 जूलै रोजी शिर्डीतल्या एका हॉटेलमध्ये 2 संशयित इसम बनावट आधारकार्ड देऊन मुक्कामी थांबलेले होते. हॉटेलच्या मधील मॅनेजरला त्या दोघांकडे बनावट आधारकार्ड असल्याचा संशय आल्यानं शिर्डी पोलिसांना तक्रार अर्ज देण्यात आला. त्या तक्रारी अर्जाच्या चौकशीमध्ये हॉटेलमध्ये थांबलेल्या त्या 2 इसमांनी बनावट आधारकार्ड देऊन वास्तव्य केल्याचं निष्पन्न झालं. नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या दोघांना नुकतीच अटक केली. वसीम ताहीर शेख (वय रा. बिलोली, जिल्हा नांदेड) आणि फिरोज रफीक शेख (वय 29 रा. सुतारगल्ली, बिलोली, जिल्हा नांदेड) ही त्यांची नावं आहेत.
शिर्डीमध्ये दहशतवादी येऊन राहिल्याची बातमी पसरल्यानं शिर्डी परिसरातल्या हॉटेल व इतर व्यावसायिकांमध्ये घबराटीचं वातावरण तयार झाले होते. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि दिनेश आहेर (स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर) यांना या गुन्ह्यातल्या दोन्ही आरोपींचा शोध घेवुन त्यांना अटक करण्याबाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/समाधान भाटेवाल तसेच अंमलदार दत्तात्रय गव्हाणे, रविंद्र कर्डीले, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, संदीप दरंदले, फुरकान शेख, संतोष खैरे, आकाश काळे, सागर ससाणे, रोहित येमुल व संभाजी कोतकर अशांचे पथक नेमून नमुद गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले होते.
पोकॉ गणेश रघुनाथ घुले ने. शिर्डी पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिर्डी पो. स्टे. गु. र. नं. 422 / 2024 भारतीय न्याय संहिता सन 2023 चे कलम 336, 336 (2), 336 (3), 337, 340 (2) प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लागलीच शिर्डी येथील हॉटेलच्या ठिकाणी जाऊन सदर हॉटेल आणि हॉटेलच्या आजुबाजूचे सीसीटीव्ही फुटेज चेक करुन संशयितांचे फोटो गुप्तबातमीदारांना प्रसारित केले. हे पथक गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असतांना दिनांक 19/07/24 रोजी पोनि आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, प्रसारित केलेल्या फोटोतील 2 संशयित इसम हे काळ्या रंगाच्या विना क्रमांकाचे महिंद्रा थार गाडीमधून छत्रपती संभाजीनगर येथून नेवाशाच्या दिशेने येत आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळाली .
त्या माहितीच्या आधारे पोनि आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवून खात्री करुन आरोपीविरुध्द कारवाई करणे बाबत सुचना दिल्या. पथकाने तात्काळ खडका फाटा (ता. नेवासा) येथील टोल नाका येथे जाऊन सापळा रचून थांबलेले असतांना थोडाच वेळात काळ्या रंगाची विना क्रमांकाची थार गाडी येताना पथकास दिसली. पथकानं सदर गाडी थांबवण्याचा इशारा करताच संशयितांनी ताब्यातील थार गाडी छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने वळवून पळून जाण्याच्या तयारीत असतांना पथकानं त्यांना शिताफीनं ताब्यात घेतलं.
या दोन्ही इसमांकडे हॉटेल टेम्पल ट्री, शिर्डी येथे बनावट आधारकार्ड देऊन रुम बुक करुन राहण्याचे कारणाबाबत विचारपुस करता दोन्ही संशयित हे बनावट सोने आणुन शिर्डी परिसरातील नागरीकांच्या ओळख करुन, नागरिकांचा विश्वास संपादन करुन त्यांचेकडे असलेले केमिकलचे आधारे बनावट सोने हे खरे असल्याचे भासवून विक्री करण्याकरीता असल्याचे सांगितल्यानं त्यांच्याकडील बॅगची झडती घेतली असता त्यांचेकडे विविध प्रकारचे रसायनांच्या बाटल्या, मोबाईल फोन व महिंद्रा कंपनीची थार असा एकुण 13 लाख 35 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपींना ताब्यात घेऊन शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर केलं आहे.