एखाद्या कुटुंबावर संकटाचा, दुःखाचा डोंगर कोसळल्यावर काय होतं, ते कुटुंब कशा पद्धतीने सैरभैर होतं, त्या कुटुंबाची माणसं कशा पद्धतीनं हवालदिल होतात, याचा अनुभव नेवासे तालुक्यातल्या खरवंडी या छोट्याशा गावाजवळ असलेल्या विश्वासनगर या भागातल्या फाटके कुटुंबाच्या सदस्यांसह तमाम नेवासकरांनी घेतलाय. इमामपूर घाटात ऐन निर्जला एकादशीच्या दिवशी (दि. १८) झालेल्या भीषण अपघातात घरातला कर्ता पुरुष गेल्यानं फाटके कुटुंबावर संकटाचा आणि दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अशा या कठीण प्रसंगात फाटके कुटुंबातल्या सदस्यांचं नेवासकरांकडून सांत्वन केलं जात असून या कुटुंबाला आधार देण्याचं काम या तालुक्यातल्या प्रत्येक घटकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या होत आहे. नेवासा भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील यांनी फाटके कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही ‘महासत्ता भारत’ न्युज नेटवर्कशी बोलताना दिलीय.
या घटनेच्या निमित्तानं ‘महासत्ता भारत’ न्यूज नेटवर्कनं फाटके यांच्या घरी जाऊन स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला. स्व. अनिल दगडू फाटके यांना ज्या कंटेनरनं धडक दिली, तो कंटेनर प्रचंड अवाढव्य असा होता आणि त्या कंटेनरमध्ये डांबराचे अनेक ड्रम्स होते. त्यापैकी एक – दोन ड्रम्स स्व. फाटके यांच्या अंगावर पडले. त्या विचित्र अपघातामुळे नेवासा परिसरातल्या स्थानिक ग्रामस्थांमधून आरटीओ कार्यालयाच्या कारभाराविषयी प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.