महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा असलेल्या राज ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सात अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. यामध्ये भारतीय संविधानाला धक्का लावणार नाही, हे जनतेला ठणकावून सांगा, अशी एक अपेक्षा आहे.
राज ठाकरे यांनी कोणत्या सात अपेक्षा व्यक्त केल्या आहेत, ते आता आपण जाणून घेऊयात. ठाकरे यांची पहिली अपेक्षा ही आहे, की तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घ्यावा. कारण हा निर्णय अनेक वर्षांपासून खितपत पडला आहे.
ठाकरे यांची दुसरी अपेक्षा अशी आहे, की अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होईल की नाही, हे जरी अस्पष्ट असलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले जे गड किल्ले आहेत, त्या गड आणि किल्ल्यांना शिवकालीन वैभव प्राप्त करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय समिती स्थापन करा.
ठाकरे यांची तिसरी अपेक्षा ही आहे, की हिंदुस्थानवर पराक्रम गाजवणाऱ्या मराठ्यांचा इतिहास शालेय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमात समाविष्ट करा तर चौथी अपेक्षा ही आहे, की खड्ड्यांनी व्यापलेला मुंबई – गोवा हा महामार्ग तात्काळ दुरुस्त करा.
ठाकरे यांची पाचवी अपेक्षा ही आहे, की विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला धक्का लावणार नाही, हे भारतीय जनतेला ठणकावून सांगा. ठाकरे यांची सहावी अपेक्षा ही आहे, की काही मूठभर मुसलमानांना दहा वर्षांत डोकं वर काढता आलं नाही. म्हणून ते काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांना पाठिंबा द्यायला निघाले आहेत. अशा मूठभर देशद्रोहींच्या अड्ड्यात लोक घुसवा आणि देश कायमचा सुरक्षित करा. ठाकरे यांची शेवटची आणि सातवी अपेक्षा ही आहे, की मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेला जास्तीत जास्त निधी द्या.
राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त केलेल्या या अपेक्षांविषयी तुम्हाला काय वाटतं, मोदी या अपेक्षा पूर्ण करु शकतील का, याविषयी कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त करा.