एका अनोळखी माणसाचा खून करुन त्याच्या मृतदेहाचे अक्षरशः तुकडे तुकडे करुन कोणी तरी पाटात (मुळा धरणातून येणाऱ्या पाण्यात) टाकून दिले. पोलीस पाटील प्रल्हाद यशवंत ससाने यांनी यासंदर्भात नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ही माहिती समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ हे घटनास्थळी पोहोचले. काही वेळानंतर ग्रामीण डीवायएसपी सचिन पाटील आणि श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांनीदेखील घटनास्थळाची पाहणी केली.
काल (दि. १७) दुपारी चार वाजता हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात अद्यापपर्यंत पोलिसांनी कोणाला ताब्यात घेतलेलं नाही. त्यामुळे ज्याचा खून झाला, तो कोण आणि कुठला होता, त्याचा खून कोणी आणि कशासाठी केला असावा, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
अर्थातच या प्रश्नांची उकल करण्यासाठी पोलिसांना तपास करण्यासाठी प्रचंड वेळ लागणार आहे. नेवासे तालुक्यातल्या जनतेनं यासाठी पोलिसांना योग्य ते सहकार्य करणं अपेक्षित आहे. याविषयी जर कोणाला काही माहित असेल तर सर्वात प्रथम नेवासे पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असं आवाहन पोलिसांच्यावतीन करण्यात आलं आहे.