लोकसभेची निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. खरं तर या निवडणुकीमध्ये देशपातळीवरच्या मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी. केंद्र सरकारच्या योजना कोणत्या लोकप्रतिनिधीने किती राबवल्या, नवनवीन उद्योग आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न कोणी केला, उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून मतदारसंघाचा चेहरा मोहरा कोणी बदलविला, मतदार संघातल्या जनतेला पायाभूत सुविधा कोणी दिल्या, या मुद्द्यांवर खऱ्या अर्थानं मंथन होणं गरजेचं आहे.
दुर्दैवाची बाब अशी आहे, की लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला नऊ दिवसांचा कालावधी उरला असला तरी या लोकसभा निवडणूक प्रचाराच्या दरम्यान वरील मुद्द्यांपैकी एकही मुद्दा चर्चेला गेला नाही. अजूनही एकच मुद्दा गाजतो आहे आणि तो म्हणजे इकडं खासदार लोखंडे भेटत नाहीत आणि तिकडं खासदार विखे भेटत नाहीत.
या पार्श्वभूमीवर नगर दक्षिण आणि उत्तर या दोन्ही लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांमध्ये कमालीची संभ्रमावस्था पसरली असून मग काय फायदा या लोकप्रतिनिधींचा?असादेखील प्रश्न मतदारांमधून उपस्थित केला जात आहे. येत्या सहा मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नगरमध्ये सभा घेणार असल्याचं बोललं जातंय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेदेखील नगरमध्ये सभा घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.
कदाचित या बड्या नेत्यांच्या सभेमध्ये देशपातळीवरचे प्रश्न चर्चेत येतील, अशी अपेक्षा आहे. परंतू जनतेला सहज भेटणारा, जनतेची सुख-दुःखं जाणून घेणारा, प्रामाणिकपणे काम करणारा, जनतेला आपला वाटणारा असा लोकप्रतिनिधी जनतेला अपेक्षित असतो. पण नगर उत्तर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर खासदार लोखंडे सहसा भेटतच नाहीत. फोनही घेत नाहीत. दुसऱ्या बाजूला नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर खासदार डॉक्टर विखे यांना संपर्क करायला गेल्यास आधी त्यांच्या अनेक पीएंच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. एवढं होऊनही खासदार विखे भेटत नाहीत, अशा तक्रारी अजूनही या दोन्ही मतदारसंघात केल्या जात आहेत.
उत्तर आणि दक्षिणेत नक्की कोणाला बसणार फटका?
मतदारांची नाराजी खासदार लोखंडे आणि खासदार विखे हे दूर करू शकतील का? या दोघांच्या नाराजीचा फायदा दक्षिणेत निलेश लंके आणि उत्तरेत उत्कर्षा रुपवते यांना होईल का? माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची यंत्रणा कधी सक्रिय होणार? या लोकसभा निवडणुकीत कोणाची यंत्रणा किती प्रभावी ठरणार? या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नक्की कोणाला फटका बसणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी मात्र सर्वांनाच ४ तारखेपर्यंत वाट पहावी लागणार आहे.