नगर तालुक्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीर धंदे, वाढती गुन्हेगारी, चोऱ्या, घरफोड्या याकडे स्थानिक पोलिसांचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. मात्र राजकीय दबावातून आमच्यासारख्यांना खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे जर थांबलं नाही तर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, नाशिक परिक्षेत्राचे महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्याकडे तक्रार करण्यात येईल. तिथंही न्याय मिळाला नाही तर नगर तालुका पोलिसांविरुद्ध न्यायालयात जाणार, असा निर्धार नगर तालुक्यातल्या चिचोंडी पाटील गावचे सरपंच शरद पवार यांनी केलाय.
नगर दक्षिण मतदार संघातले महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या समर्थकांना पोलिसांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप सध्या केला जात आहे. या संदर्भात सरपंच शरद पवार यांचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला. या व्हिडिओच्या माध्यमातून हा आरोप करण्यात आलाय.
सरपंच पवार यांनी सांगितलं, की नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाकडून आपल्याला जामीन देण्यात आला आहे. हा जामीन देत असताना मला गावात येण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र मी सरपंच असल्यानं ग्रामपंचायतीच्या बैठका, पाणी पुरवठा तसेच इतर बैठकांना ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहण्याची न्यायालयानं मुभा दिली आहे.
न्यायालयाच्या या जामिनाची प्रत नगर तालुका पोलिसांना दिली आहे. ग्रामपंचायतीच्या बैठकीसाठी गेलो असता नगर तालुका पोलिसांचा फौज फाटा गावात आला. सपोनि प्रल्हाद गीते यांनी मला ग्रामपंचायत कार्यालय बाहेर पोलिसांसमोर धमकावलं.