भारतीय जनता पार्टीने मागील दोन वर्षांपासून ‘मिशन बारामती’ हे अभियान हाती घेतलं आहे. त्यामध्ये यावेळी अजित पवार यांची भाजपला ताकद मिळाली आहे. अजित पवारांच्या ताकदीच्या जोरावर शरद पवार यांचा बालेकिल्ला हिसकावून घेण्याची व्यूहरचना आखण्यात आली असून त्यासाठी भाजपनं आक्रमक पवित्रा घेतला आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एप्रिल महिन्याच्या अखेरीस किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर सभा होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सभेसाठी भाजपचे नेते आग्रही असून त्यादृष्टीनं मोदी यांच्याकडे विनंती करण्यात आली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगणार आहे. शरद पवार यांचा हा बालेकिल्ला असून तो हिसकावून घेण्यासाठीच पंतप्रधान मोदींची सभा आयोजित करण्याचे भाजप नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भात म्हटलं आहे, की ‘पंतप्रधान मोदी यांच्या विदर्भात सध्या दोन सभा आहेत. पुणे जिल्ह्यातल्या महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेण्याची विनंती पंतप्रधान मोदी यांना करण्यात आले आहे. मात्र या सभेविषयी अद्याप काहीही निश्चित झालेलं नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सांगितलंय, की पुणे जिल्ह्यातल्या महायुतीच्या चारही उमेदवारांच्या विजयासाठी सभा घेण्याची आमची इच्छा असून तसे प्रयत्न सुरू आहेत. खडकवासला इथं प्रशस्त मैदान आणि पार्किंगची व्यवस्था असल्याने या परिसरातच पंतप्रधान मोदींची सभा होईल’.