नगर तालुक्यातल्या मौजे चिचोंडी पाटील या गावात दि. 2 एप्रिल रोजी घर जळिताची जी अत्यंत दुर्दैवी घटना घडली होती, त्या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच या प्रकरणाशी ज्यांचा संबंध आहे, त्या सर्वच संशयितांची नार्को ॲनालिसिस, ब्रेन मॅपिंग आणि लायडिटेक्टींग चाचणी करण्यात येऊन सर्व वस्तुस्थिती जनतेसमोर यावी, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे कार्यकर्ते सुधीर भद्रे यांनी केली आहे. भद्रे यांनी घर जळिताची जी घटना घडली, त्याच्या दुसऱ्याच दिवशी अर्थात दि. 3 एप्रिल रोजी नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना मेलद्वारे निवेदन पाठवलं होतं.
भद्रे यांनी या निवेदनात म्हटले आहे, की घर जळिताची ही जी घटना घडली, त्या कोळी कुटुंबाला शासकीय मदत मिळवून देण्यासाठी किंवा वर्गणी करुन आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी पिंपळगाव लांडगा इथं पत्नी आणि दोन मुलींना जाळून मारण्याची जशी घटना घडली होती, त्या घटनेचीच पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला आहे. या जागेवर ताबा मारण्यासाठी काही समाजकंटक आणि इतरांनी हा प्रयत्न केला आहे का, याची चौकशी होणं गरजेचं आहे.
चिचोंडी पाटील गावात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. घर जळिताची ही जी घटना घडली, ती एसटी बसस्थानकाजवळच घडली आहे. पोलीस प्रशासनानं सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज चेक करुन आग लागलेल्या जागेची भौगोलिक स्थिती, जिथं आग लागली तिथे बाहेरचा कोणी आग लावू शकतो का, किंवा शॉर्टसर्किटनं तर ही आग लागली नाही ना, याची शहानिशा करण्यावर पोलिसांनी खरं तर भर द्यायला हवा.
कुणावर तरी स्वतःचा राग काढण्यासाठी खोटे कुठे दाखल करण्यासाठीचं हे षडयंत्र होतं, याची पोलीस प्रशासनानं कसून चौकशी करावी. खरं तर पोलीस प्रशासनानं आतापर्यंत अनेक किचकट गुन्ह्याची उकल केलेली आहे. अशाच प्रकारे पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावावा. पोलिसांनी शक्य असल्यास चौकशीचे सर्व मुद्दे वापरुन ज्यांनी व्हिडिओ व्हायरल केला त्यांचे आणि कोळी समाजाच्या सर्वांची तसेच संशयित असलेल्या सर्वांशी नार्को ॲनालिसिस, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टिंगची चाचणी करण्यात यावी.