वाढत्या शहरीकरणामुळे घरे, फ्लॅट आणि बंगल्यांच्या बांधकामासाठी सर्वात महत्त्वाचं साहित्य असलेल्या विटांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळे नगर तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागांत वीरभट्ट्यांचं जाळं मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. या वीट भट्टाचालकांकडून प्रदूषण नियंत्रणासाठीच्या नियमांचं सर्रासपणे उल्लंघन केलं जात आहे. त्यामुळे कोट्यवधींचा महसूल बुडवून मालामाल झालेल्या वीट भट्ट्याचालकांकडे महसूल विभागाचं लक्ष आहे का, हाच खरा प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर नगरचे जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी एकदा उग्रावतार धारण करायलाच हवा, अशी अपेक्षा नगरकरांमधून व्यक्त केली जात आहे.
वीट भट्ट्यांमुळे प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा श्वास कोंडला जात आहे. दुर्गंधीयुक्त धुरामुळे आरोग्यावर हानिकारक परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी विनापरवाना अवैध वीट भट्ट्या सुरु आहेत. नेवासे तालुक्यासह विविध ठिकाणी सुरु असलेल्या वीट भट्ट्यांची चौकशी करण्याची गरज आहे.
बेकायदेशीरपणे वीट भट्ट्या सुरु करणाऱ्या शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बडवला आहे. बेकायदेशीरपणे गौणखणिजची चोरी आणि वाहतूक करणाऱ्या वीट भट्ट्या चालकांविरुद्ध महसूल विभागाने फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी या निमित्तानं केली जात आहे.
याप्रकरणी ज्या ज्या तहसीलदारांकडून दुर्लक्ष होत आहे, त्यांच्या विरुद्धदेखील दप्तर दिरंगाई कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.