अहिल्यादेवी नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी पदाचा दुरुपयोग करत सक्षम आणि नियमित बांधकाम विभाग (दक्षिण) चे कार्यकारी अभियंत्याला सक्तीच्या रजेवर पाठवून त्याठिकाणी स्व-हितासाठी नेमलेल्या अवैध प्रभारी कनिष्ठ दर्जाच्या शाखा अभियंत्याची नेमणूक केली असल्याचा आरोप सध्या होत आहे. यानिमित्तानं ‘महासत्ता भारत’ वेब न्यूज नेटवर्कच्यावतीनं नगर झेडपीचे सीईओ आशिष येरेकर यांना आमचा जाहीर सवाल आहे, की सीईओ साहेब, हे खरं आहे का, या आरोपांचा कराल का खुलासा?
दरम्यान, या प्रकरणीसखोल चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. मागील दीड वर्षापासून जिल्हा परिषद बांधकाम विभाग दक्षिण या ठिकाणी कार्यकारी अभियंता या पदावर वंदेश उरांडे यांची शासनाने सक्षम व नियमित अधिकारी म्हणून नेमणूक केलेली आहे. त्यांचा यानंतरही आणखी जवळपास आठ महिन्यांचा कालावधी सेवानिवृत्ती होण्यासाठी बाकी आहे .परंतु मागील आठ दिवसापूर्वी अचानकपणे त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी सक्तीच्या रजेवर पाठवलं आणि त्याठिकाणी कार्यकारी अभियंता दक्षिण पदावर प्रभारी म्हणून प्रशांत ध्रुपद या कनिष्ठ दर्जाच्या आणि वादग्रस्त शाखा अभियंत्याची निवड केली गेली.
कार्यकारी अभियंता या पदावर प्रभारी म्हणून अधिकारी नेमणूक करण्यासाठी ते पद रिक्त असूनही शासन स्तरावर नवीन अधिकारी उपलब्ध होत नसेल तर ते पद नव्याने अधिकारी नियुक्त होईपर्यंत काही ठराविक कालावधीपर्यंतच प्रभारी म्हणून सक्षम आणि समकक्ष दर्जाच्या अधिकाऱ्यास देता येते. तसेच जिल्हा परिषदेच्या इतर विभागातील समकक्ष अधिकाऱ्याचीच नेमणूक अशा पदावर करता येते. ज्या अधिकाऱ्यास प्रभारी म्हणून नियुक्ती दिली जात आहे, तो अधिकारी यापूर्वी किमान उपअभियंता या पदावर कार्यरत असावा तसेच जिल्ह्यातील उपअभियंता सेवाश्रेष्ठता यादीमध्येदेखील अव्वल स्थानावर असावा. तसेच तो जिल्हा परिषद विभागातील इतर समकक्ष विभागांमध्ये कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत असावा. मात्र यावेळी कार्यकारी अभियंता दक्षिण हे पद प्रभारी म्हणून देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्व-हितासाठी हे पद मर्जीतील दुय्यम अधिकाऱ्यास शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसून दिल्याचे निदर्शनास येत आहे.
याचं मुख्य कारण म्हणजे या पदावर जिल्हा परिषद विभागातील इतर कार्यकारी अभियंत्यांना प्रभारी पद देणे गरजेचे होते. परंतु कार्यकारी अभियंता दक्षिण म्हणुन प्रशांत ध्रुपद यांची नेमणूक झालेली आहे. ते यापूर्वी कधीही कुठल्याही तालुक्यामध्ये उपअभियंता म्हणून कार्यरत नव्हते. मागील काही महिन्यापूर्वीच पारनेर तालुक्यात बांधकाम विभागांमध्ये शाखा अभियंता या पदावर ते कार्यरत होते. त्यानंतर साधारण अडीच महिन्यापूर्वी त्यांची जिल्हा परिषद बांधकाम विभाग उत्तर येथे पी.ओ. (प्रकल्प अभियंता) या पदावर नेमणूक करण्यात आली. यापूर्वी कार्यकारी अभियंता (दक्षिण) वंदेश उराडे यांनी कोणाचीही मनमर्जी न चालून देता व्यवस्थितरित्या नियमानुसार काम करत होते. त्यांना जाणून-बुजून सक्तीच्या रजेवर पाठवून त्याठिकाणी स्व-हितासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी एका कनिष्ठ दर्जाच्या शाखा अभियंत्यास, जो पारनेर तालुक्यात शाखा अभियंता काम करत असताना वादग्रस्त अधिकारी म्हणून प्रख्यात होता, अशी देखीलचर्चा या निमित्तानं ऐकायला मिळत आहे.
अशा अनुभवहीन व्यक्तीला जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या सर्वोच्च पदावर रात्रीतून घडामोडी होऊन विशेष कृपाशिर्वादानं का बसवले गेले? या सर्व घटनेची सखोल चौकशी होऊन या घटनेस जबाबदार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची चौकशी करून निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
बातम्यांसाठी संपर्क :
Mo. No. 70 28 35 17 47