नगर महापालिकेच्या भोंगळ कारभाराची चिरफाड ‘महासत्ता भारत’नं यापूर्वी वेळोवेळी केलेली आहे. ‘आंधळं दळतंय आन् कुत्रं पीठ खातंय’, या पठडीतला या महिपालिकेच्या कारभारात सामान्य नगरकरांच्या कोट्यवधी रुपयांची लयलूट सुरु आहे. नगर शहरातल्या बुरुडगाव कचराडेपोतल्या गैरव्यवहाराच्या माध्यमातून ही बाब अधोरेखित झाली आहे.
या पार्श्वभूमीवर सामान्य नगरकरांना दोन प्रश्न पडले आहेत. त्यातला पहिला म्हणजे बुरुडगावच्या कचऱ्यात आणखी कोण कोण ‘लोळलंय’? आणि दुसरा प्रश्न हा, की असे गैरव्यवहार थांबणार नसतील तर नगरकर जनतेवर संकलित करांचा नाहक बोजा कशासाठी लादला जातो आहे? यानिमित्तानं नगर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक असलेल्या पंकज जावळे यांनी कोट्यवधी रुपयांच्या खर्चाची वसूली करायलाच हवीय.
या गैरव्यवहारात चमत्कारिक आणि तितकीच संतापजनक बाब ही आहे, की बुरुडडगाव कचरा डेपोतल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी नगर महापालिकेकडे मशिन्स नसतानादेखील ठेकेदाराला त्याचं बील अदा करण्याचा पराक्रम करण्यात आलाय. हे बील अदा करणाऱ्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची खरं तर कसून चौकशी करण्याची आवश्यकता आहे.
यासंदर्भात ज्या स्वच्छता निरीक्षकांना (SI) कारणे दाखवा नोटिसा बजाववण्यात आल्या, त्यातल्या एकाही SI नं समाधानकारक उत्तर दिलेलं नाही. एक बरं झालं, या प्रकरणात आयुक्त तथा प्रशासक जावळे यांनी चौकशी समिती नियुक्त केली आहे.
‘यांच्या’वर आहे बेजबाबदारपणाचा ठपका…!
या गैरव्यवहारात बेजबाबदारपणाचा ज्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे, त्या स्वच्छता निरीक्षकांमध्ये किशोर देशमुख, प्ररिक्षित एस. बीडकर, प्रशांत विजय रामदिन, अविनाश वसंतराव हंस, बाळू जगन्नाथ विधाते, राजेश प्रकाश तावरे यांची चौकशी होणार आहे.