लोकसभेची निवडणूक जाहीर झाली असून त्यासाठीची आदर्श आचारसंहितासुद्धा सर्वत्र लागू झाली आहे. या आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन अनेकवेळा होतं. तुमच्याही भागांत जर असा प्रकार झाल्याचं तुमच्या निदर्शनात आलं, तर या लेखात आम्ही तुम्हाला एक ॲप डाऊनलोड करायचं सांगणार आहोत. त्या ॲपद्वारे तुम्ही आदर्श आचारसंहिता भंगाची तक्रार देऊ शकता. आणि हो, तुमचं नावदेखील गुप्त ठेवण्यात येतं. केंद्रीय निवडणूक आयोगाने ही सुविधा तुमच्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जर तुम्हाला कुठं आदर्श आचारसंहितेचा भंग होताना दिसला तर ताबडतोब या ॲपवर फोटो किंवा दोन मिनिटांचा व्हिडिओ टाकून तुम्ही तक्रार करु शकणार आहात. सविस्तर माहितीसाठी हा लेख सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचा.
लोकसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचं पालन व्हावं, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं cVIGIL हे ॲप अपडेट केलं आहे. या ॲपच्या माध्यमातून आदर्श आचारसंहिता भंगाची तक्रार तुम्हाला काही मिनिटांत करता येणार आहे. तुमच्या तक्रारीनंतर शंभर मिनिटांत त्यावर कारवाई होणार आहे.
आदर्श आचारसंहिता भंगाची तक्रार देण्यासाठी तुम्हाला तुमच्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये हे ॲप डाऊनलोड करून घ्यावं लागणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत आदर्श आचारसंहिता भंगाच्या भरपूर तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र पुरावे नसल्यामुळे कारवाई करता आली नाही. परंतु या ॲपच्या माध्यमातून तुम्ही फोटो किंवा दोन मिनिटांचा व्हिडिओ निवडणूक आयोगाकडे पाठवून देऊ शकता त्यामुळे निवडणूक आयोगाकडे पुरावेदेखील जमा होतील आणि संबंधितांवर योग्य ती कारवाईदेखील केली जाणार आहे.