सर्वसाधारणपणे पावसाविषयी असा अंदाज व्यक्त केला जातो, की उन्हाळ्यात जर जास्त पाऊस झाला तर पावसाळ्यात कमी पाऊस होतो. मात्र यावर्षी उन्हाळ्यात अजिबात पाऊस झाला नाही. मे महिन्याचा एक आठवडा उलटला आहे. परंतु पावसाला म्हणावी तशी सुरुवात झालेली नाही. त्यामुळे जूननंतर जोरदार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर 22 जून नंतर पेरणीयोग्य पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे.
22 मे रोजी अंदमानच्या समुद्रात मान्सूनचं आगमन होणार आहे. 12 ते 13 जूनच्या दरम्यान मोसमी पावसाला सुरुवात होणार आहे. 22 जूननंतर पेरणीयोग्य पाऊस होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी शेतीच्या मशागतीचं नियोजन करायला हरकत नाही.
जूनच्या शेवटच्या आठवड्यात खरिपातल्या बऱ्याचशा पेरण्या पूर्ण होतील. यावर्षी जुलै महिन्यात जास्त पाऊस आहे. ऑगस्ट महिन्यात कमी आहे. पण सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस होणार आहे. राज्यात पूर्व मोसमी पावसाला पोषक परिस्थिती तयार होत आहे. दरम्यान, राज्यातल्या बऱ्याच भागांत मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे.