2017 सालात अहमदनगरमध्ये झाली बेकायदा शिक्षक भरती !
विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या या आरोपाचा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी केला ‘असा’ खुलासा !
राज्यात शिक्षक भरती बंद असताना २०१७ मध्ये अहमदनगर जिल्ह्यात काही शिक्षण संस्थांना शिक्षक भरतीसाठी मान्यता देण्यात आल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बुधवारी विधानसभेत केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी याप्रकरणी एसआयटी नेमून चौकशी करण्याची आणि संबंधित व्यक्तींच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.
या आरोपावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षक भरती योग्य आहे की नाही तसेच त्यावेळी झालेला निर्णय नियमात बसतो की नाही हे तपासून घेतले जाईल, असं सांगत वेळ मारून नेली.
अहमदनगर जिल्ह्यातल्या शिक्षकांच्या पदांना मान्यता देऊन बनावट आदेश काढल्याप्रकरणी भाजपचे आमदार पराग आळवणी यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न विचारला होता. या प्रश्नावरील चर्चेत भाग घेताना अजित पवार यांनी तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या कार्यकाळात राज्यात शिक्षक भरती बंद असताना अहमदनगर जिल्ह्यातील काही शिक्षण संस्थांना शिक्षक भरतीसाठी मान्यता देण्यात आल्याचा आरोप केला.
शालेय शिक्षण विभागाच्या अवर सचिवांनी २०१७ मध्ये नगरचे माध्यमिक शिक्षण अधिकारी यांना लिहिलेल्या पत्रात शिक्षक भरतीला मान्यता दिल्याचे दिसून येत असून मंत्रालय स्तरावरचे हे आदेश बनावट आहेत की नाही याची खात्री देता येत नसल्याचे पत्रात नमूद करण्यात आल्याचे पवार यांनी सरकारच्या निदर्शनास आणले.
शिक्षक भरती बंद असताना तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ज्या निवडक शिक्षण संस्थांसोबत बैठक घेतली त्याच संस्थांना शिक्षक भरतीसाठी मान्यता कशी देण्यात आली आणि अशी मान्यता देणे नियमात बसते काय? अशी विचारणा पवार यांनी केली.
या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री केसरकर यांनी सविस्तर माहिती दिली. अगस्ती शिक्षण संस्थेला तीन शिक्षकांची मान्यता देण्यात आली होती. ही मान्यता चुकीच्या पद्धतीने दिल्याचे लक्षात आल्यावर शिक्षण उपसंचालकानी ती रद्द केली. उच्च न्यायालयाने याबाबत गुणवत्तेवर निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.
हिंदसेवा शिक्षण संस्थेला १४ शिक्षकांची मान्यता मिळाली होती. मात्र, तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यावर सुनावणी घेण्यात आली. सुनावणी नंतर ९ शिक्षकांची मान्यता रद्द करण्यात आली.
राहुरीतील शिवाजी शिक्षण संस्थेला ९ शिक्षकांची भरती करण्यास मान्यता मिळाली होती. हे सर्व शिक्षक गुणवत्तेवर पात्र ठरले. तर प्रवरा शिक्षण संस्थेला मिळालेल्या शिक्षक भरतीच्या मान्यतेचे सर्व प्रस्ताव योग्य आढळून आले आहेत.
शिक्षक भरतीच्या प्रक्रियेत चुकीची मान्यता दिली असेल तर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करताना या निर्णयात सरकारला कोणत्याही तोटा झाला नसल्याचे केसरकर यांनी सांगितले. यावेळी रवींद्र वायकर बाळासाहेब पाटील, राहुल कुल आदींनी उपप्रश्न विचारले.