‘मातोश्री’वर ‘रेड कार्पेट’ ; उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा विचार सोडला ; पालकमंत्री राधाकृष्ण विखेंची टीका !
महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्याचे काम होत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करणार्या राहुल गांधी यांच्याकरिता ‘मातोश्री’वर लाल कार्पेट टाकण्याची तयारी सुरू असल्याचे म्हणत उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा विचार सोडल्याची टीका विखे यांनी केली.
भाजप आणि शिवसेना (शिंदे) सरकार पडेल, अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांची भविष्यवाणी हास्यास्पद असून, सध्या महाविकास आघाडीत भविष्यकारांची संख्या वाढल्याची खरमरीत टीका विखे पाटील यांनी या वेळी केली. तसेच, अलीकडच्या काळात अजित पवार यांचे नाव भाजपशी जोडले जात असल्याबद्दल अजित पवारच सांगू शकतील, असे म्हणत विखे पाटील यांनी या विषयावर बोलणे टाळले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा काँग्रेस नेत्यांकडून होत असलेला अपमान उद्धव ठाकरे शांतपणे बघत असल्याचे आश्चर्य वाटते. सत्तेसाठी विचार सोडणार्या उद्धव ठाकरे यांचा ‘रिमोट कंट्रोल’ आता ‘सिल्व्हर ओक’वर असल्याची टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केलीय. अहमदनगर येथे माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील यांनी ठाकरे तसेच महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवर टीका केली.
राज्यात आघाडीच्या वज्रमूठ सभा सुरू असल्या, तरी ही वज्रमूठ केव्हा सैल होईल त्यांना कळणार नाही. महाविकास आघाडीत सुरू झालेले मतभेद पाहता तीन पक्षांचे नेतेच भविष्यात एकमेकांवर मूठ उगारल्याशिवाय राहणार नाहीत. विरोधकांकडे कुठलाही अजेंडा नाही. त्यामुळे अशा वज्रमूठ सभा घेत फिरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
उद्धव ठाकरे हे सत्ता गेल्याने वैफल्यग्रस्त झाले असून, त्यांचा रिमोट कंट्रोल आता ‘सिल्व्हर ओक’वर असल्याने ते स्वतःचे मतही आता मांडू शकत नसल्याची टीका विखे पाटील यांनी केली. प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याचा सल्ला महाविकास आघाडीला देत विखे पाटील म्हणाले, की महाविकास आघाडी केवळ द्वेषाने पछाडली आहे.