पुण्यातलं वारजे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे गोरगरिबांसाठी नसून या हॉस्पिटलमध्ये फक्त 16% लोकांना मोफत उपचार होणार आहेत. बाकी उर्वरित 84 टक्के बेड्सचा कमर्शियल वापर होणार आहे. या हॉस्पिटलची जागा पुणे महापालिकेची असून महापालिकेने यासाठीच्या कर्जाची हमीदेखील घेतली आहे. मात्र या हॉस्पिटलचा वापर पैसे कमविण्यासाठीच होणार असून हे हॉस्पिटल तर कमर्शियल आहे. शासनानं या संदर्भात श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
पुण्यातल्या वारजे परिसरात महापालिकेच्या जागेवर परिसरात कोट्यवधी रुपये खर्चून अद्ययावत असं हॉस्पिटल उभारण्यात येत आहे. या हॉस्पिटलच्या भूमिपूजन नंतर खासदार सुप्रिया सुळे पत्रकारांशी बोलत होत्या. या हॉस्पिटलच्या उद्घाटनाप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणानंतर ‘या हॉस्पिटलमध्ये दहा टक्के बेड्स मोफत तर सहा टक्के बेड्स शासकीय दरानुसार उपलब्ध होणार आहेत. उर्वरित 84 टक्के बेडचा वापर व्यावसायिक कारणासाठी होणार असल्याचं सर्वांच्या लक्षात आलंय’, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महापालिकेची कोट्यवधी रुपयांची जमीन, 16 टक्के जेमतेम बेड्स आणि या बदल्यात महापालिकेला फक्त वर्षाला एक कोटी रुपयांचं भाडं हा सर्व प्रकार संशयास्पद असल्याचंदेखील खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. राज्य शासनानं श्वेतपत्रिका काढून जी काही वस्तुस्थिती असेल ती जनतेसमोर मांडावी. तसंच या शंभर टक्के बेड्सवर गोरगरिबांना उपचार मिळावेत, अशी मागणी असल्याचं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.