गटारीचं बांधकाम करणाऱ्या एका ठेकेदाराकडून ३३ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्ताला एसीबीच्या पथकानं रंगेहाथ पकडलंय. या अधिकाऱ्याच्या घराची एसीबीच्या पथकानं झडती घेतली असता साडेनऊ लाख रुपयांचे सोने आणि 13 लाखांची रक्कम असं घबाड आढळून आलं. सचिन सुरेंद्र महाले असं या लाचखोर अधिकाऱ्याचं नाव असून मालेगावच्या महापालिकेत तो नोकरीला आहे. एका अर्थानं महापालिका अधिकाऱ्याचा हावरटपणा सिद्ध करणारी ही कारवाई आहे.
महाले हा मालेगाव महापालिकेत वरिष्ठ लिपिक असून कर विभागाच्या सहाय्यक आयुक्त पदाचा कार्यभार त्याच्याकडे सोपविण्यात आला होता. याप्रकरणी किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे – वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उपाधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक गायत्री जाधव, हवालदार संदीप वणवे, ज्योती शार्दुल, परशुराम जाधव यांनी ही कारवाई केली.